मुंबई : राज्यातील वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.८ टक्के म्हणजे २४ लाख वाहने वाढली असून त्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या सुमारे एक लाख ९३ हजार इतकी आहे. करोनानंतरच्या कालखंडात विमान प्रवासामध्येही भरीव वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या दुप्पटीने वाढली आहे.
राज्यात मोटारींची संख्या ७.३ टक्क्यांनी वाढली असून दुचाक्यांची संख्या ५.५ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यात सध्या ६६ लाख ३२ हजार मोटारी तर तीन कोटी १५ लाख दुचाक्या आहेत. करोनानंतरच्या काळात राज्यात रुग्णवाहिकांच्या संख्येतही २०२२च्या तुलनेत साडेअकरा हजाराने वाढ झाली असून सध्या एक लाख सहा हजार रुग्णवाहिका आहेत. राज्यातील विमानतळांवरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासामध्ये दुप्पटीने वाढ झाली असून २०२१-२२ मध्ये ही संख्या अनुक्रमे दोन कोटी ४५ लाख व ३२.१२ लाख इतकी आहे, तर ती गेल्या वर्षी अनुक्रमे एक कोटी ३३ लाख आणि १२.२३ लाख इतकी होती. करोना निर्बंध शिथिल झाल्यावर विमान प्रवासामध्ये दुप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बंदरांमधून सुमारे १८८४ लाख मे.टन मालवाहतूक झाली व ती आधीच्या वर्षी १५७९ लाख मे. टन इतकी होती.
औष्णिक ऊर्जानिर्मिती वाढणार
’राज्यातील औष्णिक ऊर्जानिर्मितीत वाढ होत असून महानिर्मिती कंपनीच्या भुसावळ येथील केंद्रात ६६० मेगावॉटच्या संच उभारणीचे काम सुरू असून कोराडी येथील केंद्रात १३२० मेगावॉटच्या संचांची उभारणी केली जाणार आहे.’राज्यात ३१ मार्च २०२२ अखेपर्यंत ४५.८६ लाख कृषीपंपांचे विद्युतीकरण झाले असून त्यानंतर डिसेंबर २०२२ अखेरीपर्यंत ३६,३८१ कृषीपंपांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. महावितरणच्या उपकेंद्रावर किंवा लगतच्या क्षेत्रात सौर प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असून २०२२-२३ मध्ये डिसेंबर अखेपर्यंत ५४८ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर १५०९ मेगावॉट वीज खरेदीचे करार करण्यात आले आहेत.