मुंबई : पंढरपूरला लाखो वारकरी आषाढी यात्रेसाठी पायी जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे पंढरपूर वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. ‘निर्मल वारी’ योजनेअंतर्गत ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्याकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आजारी वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील.

● शिवकालीन १२ किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त होण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

● कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी व गणेशोत्सवाबाबत याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येतील.

हेही वाचा >>> दहा लाख युवकांना दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन; डॉक्टरांची संख्या वाढविण्यावर भर

● शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक निधी पुरविण्यात येणार आहे.

● नागपूर जिल्ह्यातील रामटेक तीर्थस्थळाच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यात २११ कोटी रुपयांची विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत.

● आध्यात्मिक गुरु व समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांच्या मौदा तालुक्यातील (जि.नागपूर) पावडदौना येथील स्मारकासाठी ७७ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

● संत ज्ञानेश्वर महाराजांनी अजरामर ज्ञानेश्वरीची रचना केली, त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

● छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा (जि.सांगली) येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुर्जी (जि.अमरावती) येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल.