मोठय़ा आशेने पाहिल्या गेलेल्या अर्थसंकल्पातून प्रत्यक्ष झालेल्या घोर अपेक्षाभंगाचा दृश्य परिणाम मुंबई शेअर बाजारात गुरुवारी स्पष्टपणे दिसून आला. दिवसाची सुरुवात सेन्सेक्समध्ये १७० अंशांच्या उसळीसह मोठय़ा आशेने झाली, तर दिवसअखेर तोच चढलेला सेन्सेक्स उलटय़ा कोनात ३०० अंशांनी आपटी खाताना दिसला. संसदेत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचे अर्थसंकल्पीय भाषण जसजसे पुढे सरकत गेले तशी बाजाराची हताशा वाढत गेली आणि चढलेला निर्देशांक लोळण घेऊ लागला. २००९ नंतर शेअर बाजाराने अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केलेली ही सर्वात तिखट प्रतिक्रिया म्हणता येईल. अर्थसंकल्पाने केलेली निराशा आणि फेब्रुवारी महिन्याच्या वायदा व्यवहारांच्या सौदापूर्तीनिमित्त झालेली विक्री या दोहोंच्या परिणामी गुरुवारी दिवसभरात निर्देशांकात तब्बल ४५० अंशांची उलटफेर झाली. परिणामी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात तब्बल ४.२ लाख कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली गेली. ही बाजारात एका दिवसात झालेली विक्रमी उलाढाल असून, यापूर्वी सर्वाधिक ४.१६ लाख कोटी रुपयांची उलाढाल बाजाराने नोंदविली आहे. तर अर्थसंकल्पापूर्वीच्या महिन्यात प्रमुख निर्देशांकांमध्ये पाच टक्क्यांची घसरणही गेल्या काही वर्षांत प्रथमच दिसून आली आहे. अर्थमंत्र्यांनी रोखे उलाढाल करात कपातीची घोषणा स्वागतार्ह असली तरी अन्य काही घटकांवर केलेली करवाढ मात्र शेअर बाजाराचा हिरमोड करणारी ठरली. सेन्सेक्समधील घसरण १.५२ टक्क्यांची तर निफ्टी या अन्य महत्त्वाच्या निर्देशांकात त्याहून मोठी १.७९ टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी दिवसअखेर १०३.८५ अंश गमावून ५,६९३.०५ अंशांवर बंद झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा