Employment Sector Union Budget 2024 Announcement : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारमण यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी पाच नव्या योजनांची घोषणा केली. यासाठी जवळपास दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “यावर्षी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी अर्थसंकल्पात १.४८ लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. देशाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी लोकांनी आमच्या सरकारला पुन्हा एकदा संधी दिली आहे.”

निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या, केंद्र सरकार रोजगाराशी संबंधित पाच योजना जाहीर करत आहे. या योजना पंतप्रधान निधीचा भाग असतील. स्थानिक संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशीही घोषणा सीतारमण यांनी केली. तसेच शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार वृद्धी करण्यासाठी अर्थसंकल्पात ३० टक्के वाढ केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचा >> Tax Slabs 2024-25 Budget 2024 Live Updates: करदात्यांसाठी मोठी घोषणा; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा जाणून घ्या एका क्लिकवर

रोजगार आणि कौशल्याशी निगडित पाच योजना कोणत्या?

पहिली योजना – प्रथम रोजगारप्राप्त कामगार

एक लाख रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कामगारांना EPFO मध्ये पहिल्यांदा नोंदणी झाल्यानंतर तीन हप्त्यांमध्ये १५ हजार रुपयांची मदत मिळेल.

दुसरी योजना – उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती

उत्पादन क्षेत्राशी निगडित पहिल्यांदाच रोजगारप्राप्त कामगारांना EPFO जमा झाल्यानंतर पहिल्या चार वर्षात इन्सेटिव्ह दिला जाईल. याचा ३० लाखांहून अधिक युवकांना फायदा होईल.

तिसरी योजना – मालकांना पाठिंबा

या योजनेच्या माध्यमातून सरकार मालकांवरील बोजा कमी करण्यासाठी मदत करेल. या माध्यमातून नव्या कर्मचाऱ्यांना EPFO योगदानात मालकांना दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी तीन हजार रुपयांचा मोबदला दिला जाईल.

चौथी योजना – महिलांचा रोजगारात सामील करून घेणे

रोजगार आणि नोकऱ्यांमध्ये महिलावर्गाचा सहभाग अधिकाधिक वाढविण्यासाठी महिलांसाठी वसतिगृह, क्रॅश कोर्स आणि इतर कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केले जातील.

पाचवी योजना – कौशल्य विकास

पाच वर्षांत २० लाख युवकांचा कौशल्य विकास करण्यात येईल. १००० आद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना अद्ययावत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी २५ हजार युवकांना कौशल्य विकासासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ५०० मोठ्या कंपन्यात १ कोटी युवकांना इंटर्नशिप मिळवून दिली जाईल. यादरम्यान दरमहा ५ हजार रुपयांचा भत्ता दिला जाईल.

रोजगारासाठी २ लाख कोटींची तरतूद

पुढच्या पाच वर्षांत जवळपास ४.१ कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रुपरेषा आखण्यात आली आहे. यासाठी अर्थसंकल्पात दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Live Updates
Story img Loader