Budget 2024 domestic institutions recovered indian stock market : गेल्या सहा महिन्यांमध्ये विदेशी वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा लावला आहे. फेब्रुवारीमध्ये निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. फेब्रुवारीपासून २२ जुलै २०२४ पर्यंत विदेशी वित्त संस्थांनी ६३,४०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. या कालावधीतही विशेषत: मे महिन्यामध्ये विदेशी वित्त संस्थांनी ४२,२१४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. भारतातील लोकसभेच्या निवडणुकांच्या या काळात विदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजाराकडे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने न बघता, कमी कालावधीत नफा कमावण्याच्या दृष्टीने बघितलं. तरीही भारतीय शेअर बाजारानं गटांगळ्या खाल्या नाहीत, कारण याच काळात स्थानिक वित्त संस्थांनी प्रचंड प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली. अवघ्या मे महिन्यात स्थानिक वित्त संस्थांनी ५५,७३३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
एप्रिल महिन्यात विदेशी वित्त संस्था नेट सेलर्स होत्या. म्हणजेच त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सपेक्षा विक्री केलेल्या शेअर्सचे मूल्य जास्त होते. या महिन्यामध्ये विदेशी वित्त संस्थांनी ३५,६९२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर नेट बायर्स असलेल्या स्थानिक वित्त संस्थांनी एप्रिलमध्ये ४४,१८६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
DII Flow किंवा स्थानिक वित्तसंस्थांच्या निधीचा ओघ
विदेशी वित्त संस्थांच्या तुलनेत स्थानिक वित्त संस्थांनी शेअर बाजाराकडे खूपच सकारात्मक दृष्टीने पाहिलेले दिसते. फेब्रुवारीमध्ये अंतरिम बजेट सादर झाल्यानंतर स्थानिक वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात २ लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी ते जुलै २०२४ या कालावधीत स्थानिक वित्त संस्थांनी मिळून केलेली एकूण गुंतवणूक ३.८४ लाख कोटी रुपयांची आहे.
सेन्सेक्स व निफ्टीचे निर्देशांक काय सांगतात?
केवळ अर्थसंकल्प सादर केला त्या दिवसाचा विचार केला तर फेब्रुवारीमध्ये अंतरिम बजेट सादर केल्यानंतर स्थानिक शेअर बाजाराचे निर्देशांक घसरलेले होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०७ अंकांनी (०.१५ टक्क्यांनी) घसरून ७१,६४५ वर स्थिरावला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २८ अंकांनी (०.१३ टक्क्यांनी) घसरून २१,६९७.४५ वर बंद झाला होता. गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर केला त्या दिवसाचा विचार केला तर शेअर बाजाराने मिश्र प्रतिक्रिया दिली होती. १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सेन्सेक्स १५८ अंकांनी वधारला होता, तर निफ्टी ४६ अंकांनी घसरला होता.
हे ही वाचा >> Budget Cheaper and Costlier List : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी; सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय
आज २३ जुलै रोजी बजेटच्या दिवशी सेन्सेक्स १ हजार अंकांनी पडला होता, पण दुपारच्या सुमारास तो थोडा सावरला असून २०० अंकांची घसरण घेत ८०,३०० च्या आसपास रेंगाळत आहे. तर निफ्टीनेही दुपारच्या सुमारास ७० अंकांच्या आसपास घसरण अनुभवली असून तो २४,५०० च्या पातळीवर आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये विदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून चांगलाच काढता पाय घेतल्याचे दिसत असून, स्थानिक वित्त संस्थांनी मात्र अजूनतरी भक्कम हात दिल्याचे दिसत आहे.