Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर झाला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोबाइल वापरकर्त्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. मोबाइल फोन आणि चार्जर यापुढे स्वस्त होणार आहेत. या उपकरणांवरील सीमाशूल्क १५ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.
मोबाइल स्वस्त होण्यासाठी पीएलआय योजनांना बळकटी
एनडीए सरकार गेल्या काही वर्षांपासून देशाअंतर्गत मोबाइलचे उत्पादन वाढविण्यासाठी पीएलआय (Production Linked Incentive) योजना आणत आहे. भारतात मोबाइल फोनचे उत्पादन व्हावे, यासाठी पीएलआय ही योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून उत्पादनावर अनेक आर्थिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. देशाअंतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तूंना जागतिक बाजाराचे दरवाजे उघडणे आणि परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणे, हे योजनेचे ध्येय आहे. या माध्यमातून भारत हा रोजगार वृद्धी आणि निर्यात वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.