Budget 2024 Ashwini Vaishnaw : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी (२३ जुलै) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. तरुण वर्ग, महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजना जाहीर केल्या. मात्र, या अर्थसंकल्पात रेल्वेबाबत कोणतीही मोठी घोषणा झाली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या ८३ मिनिटांच्या भाषणात केवळ एकदाच रेल्वेचा उल्लेख केला गेला. आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार रेल्वेवरील भांडवली खर्चात गेल्या पाच वर्षांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या खर्चातून नवे मार्ग तयार करणे, नव्या रेल्वे तयार करण्यासारखी कामं केली गेली.
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २०१९-२० मध्ये रेल्वेवरील भांडवली खर्च १.४८ लाख कोटी रुपये इतका होता, जो २०२३-२४ मध्ये २.६२ लाख कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात रेल्वेचा केवळ एकदाच उल्लेख आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीटीव्हीशी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वाधिक भांडवली खर्च असलेला अर्थसंकल्प आहे. नवे रेल्वेमार्ग तयार करणे, रेल्वे रुळांचं दुपदरीकरण करण्यासारख्या गोष्टींवर खर्च केला जाणार आहे. रेल्वेसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा आभारी आहे.”
अश्विनी वैष्णव म्हणाले, “२०१४ च्या आधी देशात एखाद्या रेल्वेची घोषणा केली जायची, मात्र त्या रेल्वेची क्षमता आहे की नाही हे सुनिश्चित केलं जात नव्हतं. पूर्वी केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी घोषणा केल्या जायच्या, कामे मात्र केली जात नव्हती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात नव्हता. गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही रेल्वेचा पाया मजबूत केला आहे. आधीच्या सरकारांच्या तुलनेत आता रेल्वे रूळ, विद्युतीकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला आहे.”
हे ही वाचा >> Parliament Session : अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ, घोषणाजी करत विरोधकांचा सभात्याग; राज्या-राज्यांत भेदभाव केल्याचा आरोप
वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य?
अलीकडच्या काळात आरामदायक व आलिशान अशा वंदे भारत रेल्वे गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र जुन्या एक्सप्रेसची संख्या फारशी वाढलेली नाही. तसेच त्यामुळे नव्या रेल्वे सादर केलेल्या नाहीत. त्यामुळे सद्याच्या सरकारचं केवळ वंदे भारत एक्सप्रेसवरच लक्ष आहे, त्यांचं इतर रेल्वेंवर आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर लक्ष नाही अशी टीका होत असते. यावरून अश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारण्यात आला की रेल्वे विभाग केवळ वंदे भारतसारख्या गाड्यांवरच लक्ष देत आहे का? ते करत असताना मध्यमवर्गीयांच्या इतर गाड्यांकडे दुर्लक्ष होतंय का? कमी उत्पन्न गटाकडे दुर्लक्ष व श्रीमंतांना अधिकाधिक सुविधा दिल्या जातायत का? यावर उत्तर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “आम्ही दोन्ही गोष्टींवर लक्ष देत आहोत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये कवच सुरक्षा व १६० किमी प्रति तास इतका विक्रमी वेग असलेल्या गाड्या पुरवण्यावर लक्ष दिलं जातंय. तसेच इतरही सुविधा पुरवल्या जात आहेत.”
© IE Online Media Services (P) Ltd