Budget 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत देशात सत्ता स्थापन केली आहे. मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी २०५) सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब व मध्यमर्गीयांसाठी अनेक योजना सादर केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद जाहीर केली. नव्या सरकारने शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व दिलं आहे. अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या, “गेल्या १० वर्षांत देशातील २३ आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता ६५ हजाराहून १.३५ लाखांपर्यंत वाढली आहे. ही वाढ १०० टक्के इतकी आहे. २०१४ नंतर सुरू झालेल्या पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधाही वाढवल्या जातील. दरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, “पाटण्यातील आयआयटीमध्ये वसतीगृह व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आयआयटीच्या सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. आता देशात आणखी ६,५०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल”. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १०,००० जागा वाढवणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच त्या म्हणाल्या, पुढील पाच वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील ७५,००० जागा वाढवल्या जातील. गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी देशात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एमबीबीएसच्या जागा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूत
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (IGNOU), स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, केंद्रीय विद्यालय संघटनेचं बजेट देखील वाढण्यात आलं आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरसाठी १८५.८५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. यात आता वाढ करण्यात आली आहे. सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय हे शिक्षण क्षेत्रासाठी नव सेंटर उभारलं जाईल. त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली जाईल अशी घोषणा सीतारमण यांनी केली.