Budget 2025 Nirmala Sitharaman Madhubani Saree : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण या यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या साडीने सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून खांद्यावर शॉल ओढली होती. त्यांनी नेसलेली ही साडी खूप खास आहे. निर्मला सीतारमण यांनी वेगवेगळी चित्र असलेली आणि सोनेरी लाल काठ असलेली पांढरी साडी नेसली आहे. त्याला साजेसा असा लाल ब्लाउज आणि शॉल ओढली आहे. दरवर्षी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी परिधान केलेल्या साड्या या देशातील प्रसिद्ध कला व राज्यांचा सन्मान म्हणून निवडलेल्या असतात. यंदाची साडी ही मधुबनी कला आणि पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांच्या कौशल्याचा सन्मान म्हणून निवडण्यात आली आहे.
दुलारी देवी या कोळी समुदायातील असून त्यांचं आयुष्य संघर्षपूर्ण असं राहिलं आहे. १६ व्या वर्षी पतीने एकटं सोडल्यानंतर आणि त्याचदरम्यान बाळ गमावल्यावर, तब्बल १६ वर्षे त्यांनी मोलकरीण म्हणून काम केलं. मात्र, या खडतर काळातही त्यांनी त्यांच्यातील कला जिवंत ठेवली. त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. निर्मला सीतारमण यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच कार्यक्रमासाठी मधुबनीला भेट दिली तेव्हा त्यांनी दुलारी देवी यांची सुद्धा आवर्जून भेट घेतली आणि बिहारमधील मधुबनी कलेबाबत चर्चा केली. यावेळी दुलारी देवींनी अर्थमंत्र्यांना ही खास साडी भेट देत अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली होती. सीतारमण यांनी दुलारी देवी यांची इच्छा पूर्ण केली आहे.
मधुबनी साडीचं रामायण कनेक्शन
‘मधुबनी’ ही कला रामायण काळापासून अस्तित्वात आहे असं मानलं जातं. मिथिला हे राजा जनकाचं (माता सीतेचे वडील) राज्य, सीता ही त्यांची ‘दुलारी’ (कन्या) आणि याच मिथिलेमधील ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळवणाऱ्या दुलारी देवी यांनी ही साडी तयार केली आहे. मधुबनी चित्रं द्विमित असतात. आकाराची बाह्य़रेषा दुहेरी असते. या दोन रेषा म्हणजे सत्य व शिव. सत्य व शिव मिळून सृष्टीची रचना होते, असं मधुबनी चित्रकार मानतात. नैसर्गिक पद्धतीचे रंग, भिंत, कागद, कापड हा पृष्ठभाग आणि पौराणिक, सामाजिक, नैसर्गिक विषय. आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे आलेली, स्त्रियांनी जपलेली ही कलापरंपरा असून सर्वाधिक चित्रं रामायण या विषयावर असतात. या कलाकारांचा सर्वात आवडता विषय ‘सीता स्वयंवर’ असतो.
५४ वर्षीय दुलारी देवी हसतमुखानं, गाणी गात चित्रनिर्मिती करतात. त्यांनी प्रचंड मेहनतीनंतर यश मिळवलं आहे. अंगणातील जमिनीपासून सुरुवात करून कागद, कॅनव्हास, भिंतीवरील अठरा फुटांची चित्रंही त्या लीलया रंगवतात. २५ ते ३० वर्षांची अखंड साधना त्यांच्या चित्रांमागे आहे. त्यामुळे सारी चित्रं परिपूर्ण असतात. त्यांच्या चित्रात फक्त धार्मिक विषयच नाही, तर समकालीन विषयही आढळतात. ‘बेटी बचाव’, ‘बेटी को पढाइयें’ अशा अनेक विषयांवर त्या चित्रं काढतात. आजवर त्यांनी जवळपास १० हजार चित्र काढली आहेत तर १,००० हून अधिक विद्यार्थ्यांना त्ंयांनी आजवर प्रशिक्षण दिलं आहे.