Kisan Credit Card Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प देशातील गरीब, शेतकरी आणि महिलांना समर्पित आहे असे सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले आहे. याचवेळी केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. लोकसभेत निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना, शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली, ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या, यावेळी त्यांनी किसान क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यात येणार असल्याचं घोषित केलं. यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे, ज्यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता सहजपणे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही केंद्र सरकारची योजना असून छोट्या शेतकऱ्यांसाठी ती वरदान ठरली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना विनातारण १.६ लाख रुपयांचं कर्ज मिळू शकतं, तर तीन वर्षांत यातून पाच लाखांपर्यंत कर्ज शेतकरी घेऊ शकतात. यासाठी वार्षिक चार टक्के व्याजदर आकारण्यात येतो. मात्र, या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीत खातं खोलणं गरजेचं आहे. किसान क्रेडिट कार्डचे फायदे मिळवण्यासाठी जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया.

कसा मिळतो ४ टक्के व्याजदराचा फायदा?

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी ५ वर्षांत ५ लाखांपर्यंत अल्पमुदतीतील कर्ज घेऊ शकतात. या कार्डसाठी ९ टक्के इतका वार्षिक व्याजदर आहे. मात्र, सरकार यावर २ टक्के अनुदान देतं, त्यामुळे हा व्याजदर ७ टक्के होतो. त्याचबरोबर जर शेतकऱ्यानं या कर्जाची वेळेत परतफेड केली तर त्याला ३ टक्क्यांची आणखी सूट मिळते. म्हणजेच शेतकऱ्याला त्याचं कर्ज हे केवळ ४ टक्के व्याजदरानेच उपलब्ध होतं.

किसान क्रेडिट कार्डची मुदत ५ वर्षांपर्यंत

किसान क्रेडिट कार्डची मुदत ही ५ वर्षांसाठी असते. यावर १.६ लाखांचं कर्ज हे विनातारण दिलं जातं. यापूर्वी ही मर्यादा ३ लाख रुपये होती. सर्व किसान क्रेडिट कार्डवर अधिसूचित पीक, क्षेत्र पीकविम्या अंतर्गत समाविष्ट केलं जातं.

पीएम किसान सन्मान निधीत खात खोलणं आवश्यक

किसान क्रेडिट कार्डसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीत खातं असणं गरजेचं आहे. केवळ ज्या शेतकऱ्यांच यामध्ये खातं आहे त्यांनाच सरकारच्या या योनजेचा फायदा घेता येऊ शकतो.

विम्याचे मिळतात हे फायदे

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी अल्पमुदतीचं कर्जाशिवाय पशू, मत्स्यपालनासाठीही कर्ज मिळेल. त्याशिवाय क्रेडिट कार्डसोबत दोन लाखांचं विमा कवचही उपलब्ध आहे. विम्यासाठी २२ ते ३३० रुपयांचा माफक हप्ता भरावा लागतो. या कार्डसोबत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत अपघाती विमाही मिळतो.

तक्रारीसाठी हेल्पलाईन

किसान क्रेडिट कार्डसंदर्भात जर शेतकऱ्यांना काही तक्रार असेल तर पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावर ते आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी 011-24300606 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा समस्या सांगू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरुनही आपली तक्रार नोंदवू शकता.

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा कराल अर्ज?

यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
या ठिकाणाहून किसान क्रेडिट कार्डचा अर्ज डाउनलोड करावा.
आपल्या जमिनीची कागदपत्रं, पिकांच्या तपशीलासह हा अर्ज भरावा.
त्याचबरोबर इतर बँकेतून आपण किसान क्रेडिट कार्ड घेतलं नसल्याची माहिती द्यावी लागेल.
ही सर्व माहिती अर्जामध्ये भरुन तो आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा.

कुठल्या कागदपत्रांची आहे आवश्यकता

ओळखपत्रासाठी : मतदान कार्ड, पॅन कार्ड, पोसपोर्ट, आधार कार्ड किंवा वाहन परवाना.
पत्त्यासाठी : मतदान कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन परवाना.

कुठे मिळेल हे कार्ड?

किसान क्रेडिट कार्ड कोणत्याही सहकारी, ग्रामीण बँकेतून घेता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया (BOI), आयडीबीआय (IDBI) या राष्ट्रीयकृत बँकांमधूनही हे कार्ड घेता येईल.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देखील किसान क्रेडिट कार्ड देतं.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2025 updates loan limit under kisan credit cards enhanced from rs 3 lakh to rs 5 lakh sjr