Stockes Raised After Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही अशी घोषणा केल्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स ५% पर्यंत वाढले आहेत. या घोषणेमुळे लोकांचा उपभोग वाढणार असून, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत चालना मिळणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ब्लू स्टार, व्हर्लपूल ऑफ इंडिया, स्विगी, कल्याण ज्वेलर्स, झोमॅटो आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे शेअर्स ५.२२% पर्यंत वाढले आहेत. अर्थसंकल्पीय भाषणानंतर, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक १०५४ अंकांनी वाढून ५८,९०६ वर पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांधकाम कंपन्यांचे शेअर्स वधारले

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाड्याच्या मूळ स्त्रोतावर कर वजावटीची (टीडीएस) सुधारित मर्यादा पूर्वीच्या वार्षिक २.४ लाख रुपयांवरून ६ लाख रुपये करण्याची घोषणा केल्यानंतर, रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये ९.३% इतकी वाढ झाली आहे. या निर्णयामुळे कराचा भार कमी होऊन आणि भाडे व्यवहार सोपे होतील अशी अपेक्षा आहे.

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर, प्रेस्टिज इस्टेट्स सारख्या स्टॉक्सचे शेअर्स बीएसई वर ९.३% ने वाढून १,४८९.९५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यानंतर शोभा लिमिटेडचा शेअर, ४.६% ने वाढून १,३८५ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे फिनिक्स मिल्स, डीएलएफ, ओबेरॉय रिअॅल्टी आणि गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्स १-२% च्या दरम्यान वाढले आहेत.

कृषी कंपन्यांच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.या घोषणेनंतर, कावेरी सीड्स, जैन इरिगेशन सिस्टम्स, मंगलम सीड्स, जेके अ‍ॅग्री जेनेटिक्स, नाथ बायो-जीन्स, धनुका अ‍ॅग्रीटेक, श्रीओसवाल सीड्स या कृषी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर (FACT), चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, दीपक फर्टिलायझर्स, गुजरात स्टेट फर्टिलायझर्स आणि कोरोमंडेल इंटरनॅशनल यासारख्या खत कंपन्यांच्या शेअर्समध्येही सुमारे ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संरक्षण क्षेत्रातील शेअर्स घसरले

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर संरक्षण क्षेत्रातील भारत डायनॅमिक्स, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, डीसीएक्स सिस्टम, एमटीएआर टेक्नॉलॉजीज यासारख्या कंपन्यांचे शेअर्स ८% पर्यंत घसरले आहेत. २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी ४,९१,७३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2025 zomato swiggy kalyan jewellers blue star whirlpool shares rise aam