Rahul Gandhi On Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासांठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या बरोबरच शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह विविध क्षेत्रासांठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक देखील केलं आहे. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. “बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर ही मलमपट्टी आहे”, अशा शब्दांत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
“बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर ही मलमपट्टी करण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल करणं आवश्यक होतं. पण हे सरकार विचारांनी दिवाळखोर आहे”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर बोलताना केला. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
A band-aid for bullet wounds!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2025
Amid global uncertainty, solving our economic crisis demanded a paradigm shift.
But this government is bankrupt of ideas.
केसी वेणुगोपाल काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनीही अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका केली. केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं की, “भारताची ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हा अर्थसंकल्प काहीही करणार नाही. सरकारने समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांसाठी कोणताही दिलासा दिलेला नाही. फक्त पोकळ घोषणा केल्या आहेत. तसेच फक्त पोकळ घोषणा देऊन जनतेची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न केला आहे”, असं केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.
The Union Budget was, for most parts, a reading of mundane circulars and minor tinkering that will do nothing to revive India’s tottering economy. For 11 years in a row, the Government has tried to hoodwink the public by giving empty slogans, with no vision or relief for the poor…
— K C Venugopal (@kcvenugopalmp) February 1, 2025
दरम्यान, केसी वेणुगोपाल यांनी असाही आरोप केला आहे की, “मोदी सरकाचा आजचा हा अर्थसंकल्प मनरेगा नष्ट करण्याचा आणखी एक प्रयत्न दिसून येतो. कारण कोट्यवधी भारतीय नागरिकांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनेसाठी तरतूद केलेले बजेट वाढवण्यात केंद्र अपयशी ठरले आहे. हे सरकार केवळ स्वतःच्या राजकारणासाठी निवडणुकीच्या युक्त्या अवलंबण्यास सक्षम आहे. मात्र, आज देशभरात जाणवत असलेल्या गंभीर आर्थिक संकटाचे निराकरण करू शकत नाही”, असं म्हणत केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.