भारतीय रेल्वेतील सुधारणांच्या झुकझुक गाडीलाही रुळावर आणू न शकणारा, सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षा, सोयीसुविधा आणि स्वच्छतेचे केवळ स्वप्नच दाखविणारा आणि छुपी प्रवासी भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला अप्रत्यक्षपणे हात घालणारा सन २०१३-१४ चा रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी लोकसभेत मांडला. प्रवाशांवर भाडेवाढीचे ओझे लादणार नसल्याचे सांगताना बन्सल यांनी मोठय़ा चलाखीने अप्रत्यक्षपणे प्रवासी भाडेवाढ केली. त्याचबरोबर मालवाहतुकीच्या दरात सरासरी ५.८ टक्के वाढ करून त्यांनी महागाईची गाडीही जलद मार्गावरून पुढे काढली.  
महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात १२ नव्या गाडय़ा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मुंबई-ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा ‘उपक्रम’ या अर्थसंकल्पातही राबविण्यात आला आहे. लोकलला एसी डबा, ७५ नवीन फेऱ्या, एलिव्हेटेड रेल्वे, कल्याण-कर्जत तिसरा रेल्वेमार्ग अशा घोषणा बन्सल यांनी केल्या. मात्र आधीच्या कटू अनुभवामुळे या भूलथापाच ठरतील, अशी शंका मुंबईकरांना भेडसावत आहे. एकंदरच कोणत्याही कल्पक, नावीन्यपूर्ण घोषणा वा संकल्पांचा अभाव असलेल्या या सरधोपट अर्थसंकल्पाने सर्वाचीच निराशा केल्याचे दिसत आहे.   

गुपचूप ‘खिसा कापला’!
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांमध्ये दोनदा रेल्वेचा प्रवास महाग करणारे केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये थेट भाडेवाढ केली नाही. मात्र आरक्षण शुल्क, तात्काळ शुल्क, पूरक अधिभारया माध्यमांतून प्रवाशांच्या खिशाला गुपचूप कात्री लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मालवाहतुकीचे दरही ५.८ टक्क्यांनी वाढवण्यात आल्याने अन्नधान्ये, वीज आणि  इंधनाच्या दरांतही वाढ होण्याची भीती आहे.

रेल्वेची पाकिटमारी कशी?
* सुपरफास्ट गाडय़ांचा पूरक अधिभार पाच ते २५ रुपये.
* स्लीपर वर्गाच्या तात्काळ शुल्कात १५ ते २५ रु.वाढ आणि वातानुकूलित चेअर कारच्या शुल्कात २५ ते ५० रुपये वाढ.
* प्रथम वर्ग आणि उच्च श्रेणीच्या आरक्षणाचे शुल्क ३५ वरून ६० रुपये, प्रथम वर्ग व वातानुकूलित -२ टायरचे ५० रु.
* वातानुकूलित चेअर कार, वातानुकूलित-३ इकॉनॉमी आणि वातानुकूलित-३ टायरचे आरक्षण शुल्क २५ वरून ४० रुपये.
*  वातानुकूलित-३ टायरच्या तात्काळ शुल्कात ५० रु. वाढ, वातानुकूलित-२ टायर व उच्च श्रेणीच्या शुल्कात १०० रु. वाढ  
* तिकीट, आरक्षण रद्द  शुल्कात पाच ते ५० रुपये वाढ.

Story img Loader