नवी दिल्ली : वाढत्या लठ्ठपणाबद्दल आणि उच्च साखर आणि मेदयुक्त प्रक्रिया केलेल्या खाद्यापदार्थांच्या (जंक फूड) वाढत्या उपभोगाबद्दल चिंता व्यक्त करत, आर्थिक पाहणी अहवालाने देशातील एकूण आजारांपैकी ५४ टक्के आजार हे आहाराच्या वाईट सवयींचा परिणामांमुळे असल्याचे नमूद केले आहे.
देशातील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येच्या आहार आणि आचरणाच्या वाईट सवयींचे प्राणघातक मिश्रण सार्वजनिक आरोग्य आणि उत्पादकता कमी करू शकते. शिवाय भारताच्या आर्थिक क्षमतचेही नुकसान होऊ शकते, असा इशारा अहवालाने दिला आहे.
हेही वाचा >>> अर्थ आकांक्षांना मुरड! विकासदराबाबत सावध अंदाज; कृषी, रोजगार, जागतिक अस्थिरतेचे अडथळे
जंक फूडच्या सेवनांतील वाढ, कमी शारीरिक हालचाली, संतुलित आहाराचा अभाव, लठ्ठपणाच्या समस्या वगैरे बाबी तरुणाईचा घात करीत असल्याचे म्हटले आहे.
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष आवश्यक
आर्थिक पाहणी अहवालामध्ये प्रथमच मानसिक आरोग्याच्या विषयावर विस्तृत आणि तपशीलवार चर्चा ने केली आहे. समाजातील मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे हे आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनांतून अत्यावश्यक आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यापेक्षा, मानसिक आरोग्य बिघडलेले असेल तर ते उत्पादकतेला प्रभावित करते, असे त्यात नमूद केले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ च्या आकडेवारीचा हवाला देऊन, भारतात १०.६ टक्के प्रौढांना मानसिक विकारांनी ग्रासले आहे तर त्या विकारांसाठी योग्य ते उपचार न घेतले जाण्याचे प्रमाण ७० ते ९२ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे अहवालाने नमूद केले आहे.