मुंबई: करोनामुळे आरोग्याकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला असून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्यास सुरुवात झाली आहे. यातूनच राज्यात सध्या असलेल्या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यापासून सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबरोबरच जिल्हावार रुग्णालय स्थापन करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.
आर्थिक पाहाणी अहवालात संसर्गजन्य आजारांचे तसेच असंसर्गजन्य आजारांचा विचार करून आरोग्य व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण तसेच नागरी भागातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याबरोबरच असंसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात प्रामुख्याने महिला व मुलांच्या आजाराला महत्त्व देण्यात आले आहे. टेलिमेडिसिन सेवेसह ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
शहरी भागाचा सातत्याने होत असलेला विकास लक्षात घेऊन राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाला चालना देताना प्रामुख्याने गरीब व झोपडपट्टी परिसरातील आरोग्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्र, फिरते दवाखाने तसेच आशा स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यात येत आहे. झोपडपट्टी परिसरातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून दहा महापालिका क्षेत्रात १०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मंजूर करण्यात आले आहेत. आदिवासी भागातील माता-बाल व अर्भकमृत्यू कमी व्हावे यासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून याच्या परिणामी गेल्या काही वर्षांत अर्भक तसेच नवजात शिशू मृत्युदर कमी झाला आहे. पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. यासाठी जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, नवसंजीवनी योजना, मातृत्व अनुदान योजना असे वेगवेगळे उपक्रम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहेत. याशिवाय राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण, कुष्ठरोग निर्मूलन, कुटुंब कल्याण कार्यक्रमापासून विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्मान जन आरोग्य योजनेअंतर्गत २०२१-२२ मध्ये ८ लाख ४७ हजार लोकांच्या शस्त्रक्रिया वा उपचार करण्यात आले तर २०२२-२३ डिसेंबरअखेरीस ६ लाख २५ हजार लोकांच्या शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. करोनाकाळात डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यात एकूण ८१ लाख ३६ हजार ६६३ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी ७९ लाख ८८ हजार, ०८२ रुग्ण बरे झाले. एकूण १,४८,४१७ मृत्यूंची नोंद करण्यात आली असून नऊ कोटी १६ लाख ५० हजार ६९० लोकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला. सात कोटी ६५ लाख ६५ हजार ००९ लोकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकटीकरणाला काही प्रमाणात सरकारने प्राधान्य दिले आहे.