ढासळत्या भांडवली बाजाराला चालना देण्यासाठी समभाग खरेदी- विक्री उलाढालीवरील कर (एसटीटी) कमी करून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचबरोबर कमॉडिटी बाजारातील उलाढालींवर कर (सीटीटी) लागू करीत नवा पायंडा घालून दिला आहे. प्रामुख्याने बिगर कृषी वस्तूंवर म्हणजे वायदे बाजारात होणारे विशेषत: धातू आदींच्या व्यवहारावर हा नवीन कर लागू होईल. समभागाप्रमाणे त्यावरही याचा दर ०.०१ टक्के असेल. पी. चिदंबरम यांनी असाच निर्णय २००८-०९ दरम्यानही घेतला होता. मात्र तत्कालीन ग्राहक व्यवहार मंत्री शरद पवार यांच्या विरोधामुळे तो अंमलात आला नव्हता. २००४ पासून भांडवली बाजारातील व्यवहारांवर शुल्क आकारले जाते. भांडवली बाजारातील विविध व्यवहारावरील शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे बाजारात समभाग खरेदी – विक्रीच्या रुपाने कमी खर्चात अधिक व्यवहार करण्यास गुंतवणूकदारांना वाव मिळेल. यानुसार समभाग व्यवहारांवरील शुल्क ०.०१७ टक्क्यावरून ०.०१ टक्क्यावर, म्युच्युअल फंड तसेच एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड यावरील शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे म्युच्युअल फंड तसेच गोल्ड ईटीएफमधील व्यवहार वाढून गुंतवणूकही वाढेल, अशी सरकारला आशा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा