अर्थसंकल्प म्हटला की त्यात आली आकडेवारी, सांख्यिकी आणि नफा-नुकसानाची गणितं. सामान्य माणसाला ही आकडेवारी ऐकून कंटाळा येतो. अर्थसंकल्पाच्या भाषणांकडे कंटाळवाणा कार्यक्रम म्हणून पाहिलं जातं. पण लोकसभेत काही अर्थमंत्र्यांनी अतिशय खुमासदार शैलीत विनादाची अधूनमधून पेरणी करत अर्थसंकल्पाची भाषणे केलेली आहेत. यासाठी शायरी, श्लोक, कविता आणि शाब्दिक कोट्यांची मदत घेतली जाते. त्यामुळे लोकसभेचं वातावरण थोडं हलकंफुलकं राहायला मदत होते. टीव्ही ऐकणाऱ्यांना देखील थोडी मजा येते. लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर अशा भाषणांसाठी एक वेगळं पेज तयार करण्यात आलं आहे. या पेजला “WIT AND HUMOUR, POETRY AND COUPLET” असे नाव देण्यात आले आहे.
द प्रिंट या वेबसाईटने १४ वी आणि १७ वी लोकसभेच्या भाषणांचे विश्लेषण केले आहे. आतापर्यंत कविता, दोहे, गाणी आणि श्लोक वापरुन कधी भाषणे केली गेली, याची माहिती काढली गेली. तेव्हा लक्षात आलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच २०१९ नंतर अशाप्रकारे अर्थसंकल्पाचे भाषण रंजक करण्यास अधिक वाव देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात खासदारांनी ५१९ वेळा आपले वाक्चातुर्य दाखवले आहे. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ अजून संपलेला नाही. या दोन वर्षात ही संख्या आणखीही वाढू शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वाधिक ३९१ वेळा (५१९ पैकी) खासदारांनी आपल्या भाषणात कविता, श्लोक किंवा दोह्यांचा तडका दिलेला आहे. तर हिवाळी अधिवेशनात ९३ आणि पावसाळी अधिवेशनात ३५ वेळा खासदारांनी अशी भाषणे केलेली आहेत.
मोदी सरकार येण्याच्या आधी युपीएच्या काळात १४ व्या लोकसभेत अशी अलंकारीक भाषणे कमी झाल्याचे समोर आले. त्यावेळी ४० भाषणे आहेत ज्याच्यामध्ये खासदारांनी शाब्दिक अलंकाराने आपल्या भाषणाला खुलविले. तर १५ व्या लोकसभेत म्हणजे २००९ ते २०१४ या काळात अशा भाषणांची संख्या वाढून ती १२९ झाली. १६ व्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भाषणांना अधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अलंकारीक भाषेचा वापर सुरु झाला. यावेळी अशी वेगळी भाषणांची संख्या काढली असता ती २५७ वर जाते. यामध्ये अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक वाक्चातुर्य दाखविल्याचे दिसत आहे.
मोदींच्या कार्यकाळात श्लोकांचा वापर वाढला
२००४ नंतर जवळपास १००० हजार अशी भाषणे आहेत, ज्यामध्ये उपरोधिक, विनोदी, शेरोशायरींनी मढलेली अलंकारीक वाक्ये आहेत. या भाषणांमध्ये ४८६ कवितांचा वापर करण्यात आला आहे. १९८ दोहे तर १३३ वेळा विरोधकांना हजरजबाबीवृत्तीने उपरोधिक टोले मारण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये संस्कृत श्लोक, दोहे यांचा बराच वापर झाला आहे. १५ व्या लोकसभेत तीन श्लोक वापरण्यात आले होते. ही संख्या वाढून १६ व्या लोकसभेत पाच तर १७ व्या लोकसभेत ही संख्या ६९ वर गेली आहे.