२०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत देशभरात तीन हजार किलोमीटरचे नवे रस्तेबांधणी प्रकल्प सुरू करण्यची घोषणा चिदम्बरम यांनी गुरुवारी केली. या योजनेत महाराष्ट्राला अग्रस्थान देण्यात आले आहे. विविध राज्यांत नवीन रस्तेबांधणी करताना उद्भवणाऱ्या समस्या सरकारच्या लक्षात आल्या असून त्या दृष्टिने रस्तेबांधणीचा नवा प्रकल्प आखण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ वाढण्यासाठी चिदम्बरम यांनी विविध घोषणा केल्या. पायाभूत सुविधा क्षेत्रात करमुक्त रोख्यांच्या आधारे पुढील आर्थिक वर्षांत ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल; तसेच दोन मोठय़ा बंदरांची उभारणी करण्यात येईल, असे ते म्हणाले. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर नवीन गुंतवणूक होत असताना पायाभूत सुविधा क्षेत्राने मागे राहून चालणार नाही. या क्षेत्रात निधीची उभारणी करण्यासाठी नव्या आणि कल्पक योजना आखाव्या लागतील, त्याचाच एक भाग म्हणून करमुक्त रोख्यांच्या आधारे ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत १२व्या पंचवार्षिक योजनेत आखण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास यामुळे मदत होईल, या उद्दिष्टापैकी ४७ टक्क्य़ांचा भार खासगी क्षेत्र उचलेल. देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकदारांनाही या क्षेत्राकडे आकृष्ट करण्यात येईल. प. बंगालमधील सागर आणि आंध्र प्रदेशात दोन नवी बंदरे उभारण्यात येतील. या नव्या बंदरांमुळे आपल्या देशातील मोठय़ा बंदरांची संख्या १२ होईल व एकूण क्षमता १० कोटी टनांनी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीनगर ते लेहदरम्यान वीज वाहून नेण्यासाठी अठराशे चाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा