Income Tax Slabs 2025 : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा त्यांनी आज केली. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, अर्थमंत्र्यांनी थेट १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ८० हजार रुपयांचा कर कमी भरावा लागेल. याचा अर्थ, त्याचा १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा कर कमी भरावा लागेल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर कमी होईल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा १ लाख १० हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला २५ टक्के कर कमी भरावा लागेल.
तुमचे उत्पन्न २४ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ३० टक्के कर द्यावा लागेल. तसंच तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर ५ ते ८ लाखांवर ५ टक्के कर द्यावा लागेल. तसंच ४ लाखांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. १८ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांचे ७० हजार रुपये वाचणार आहेत
कशी असेल नवी कर प्रणाली
० ते ४ लाख – शून्य
४ ते ८ लाख – ५ टक्के
८ ते १२ लाख – १० टक्के
१२ ते १६ लाख – १५ टक्के
१६ ते २० लाख – २० टक्के
२० ते २४ लाख – २५ टक्के
२४ लाखांवर – ३० टक्के
तुमचं उत्पन्न १६ लाख असेल तर थेट ५० हजारांची करात बचत, कशी ती जाणून घ्या
१६ लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला १.७० लाख रुपये कर भरावा लागत होता. मात्र, नवीन प्रस्तावित कर रचनेनुसार त्या व्यक्तीला १.२० लाख रुपेय कर भरावा लागणार आहे. कारण १६ ते २० लाख रुपये उत्पन्न असलेली व्यक्ती १५ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नव्या बदलांमुळे १६ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला थेट ५० हजार रुपयांचा फायदा होणार आहे.