मुंबई : अर्थसंकल्पीय भाषणात शेरोशायरी, अभंग किंवा कवितेचा अपवादानेच वापर करणाऱ्या अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या दहाव्या अर्थसंकल्पाची सुरुवात आणि शेवट तुकाराम महाराजांच्या अभंगानी केली. श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत याचा आवर्जुन उल्लेखही अजितदादांनी केला. भाजपच्या संगतीत गेल्याने अजितदादांमध्ये फरक जाणवला, अशी टिप्पणी भाषणानंतर सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांकडून करण्यात येत होती.

हेही वाचा >>> “आम्ही नवखे नाही, एखादा निर्णय घेतल्यानंतर…”; अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांनी दहावा अर्थसंकल्प आज सादर केला. एरव्ही त्यांचे भाषण तसे रुक्ष असते. पण अजितदादा भाषणाला उभे राहिले तेच सुरुवात अभंगाने झाली. ‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे’ या अभंगाचे कडवे अजितदादांनी वाचून काढले. विरोधी बाकांवरील जयंत पाटील, भास्कर जाधव यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही तर ‘बोला पुंडलिक वरदे… हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम…पंढरीनाथ महाराज की जय… ज्ञानेश्वर महाराज की जय… असा जयघोष त्यांनी केला. साऱ्या सभागृहाने अजितदादांना दाद दिली. अजित पवारांमध्ये झालेल्या या बदलाची मग आमदारांमध्ये चुळबूळ सुरू झाली. अजित पवार भाषणात घोषणांवर घोषणा करीत होते. शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या. पण मोफत विजेची घोषणा होत नव्हती. शेजारी बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले. फडणवीस यांनी त्यांनाच मध्येच थांबवून मोफत वीज…अशी सूचना केली. त्यावर अजितदादा म्हणाले , आहे पुढे. आपले १ तास ०३ मिनिटांचे भाषण पार पडल्यावर शेवटाला अजित पवार यांनी आतापर्यंत दहा वेळा राज्यातील जनतेने मला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी दिली असे सांगितले आणि ‘निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हे ही नाही ते ही नाही, वेगळा दोन्हींपासूनी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही…’ या कडव्याने शेवट केला. कधीही देवदेवतांचा उल्लेख न करणारे अजित पवार भाजपच्या संगतीत बरेच बदलले अशीच सत्तधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांची प्रतिक्रिया होती.