यंदाचे बजेट श्रीमंतांवर मोठे कर लादेल. महिलांच्या सुखसुविधा वाढविणारे बजेट राहील. लांब अंतराचे रेल्वे भाडे प्रचंड वाढेल. राहत्या घरांच्या संदर्भातील एक धोरण जाहीर होईल. उच्चशिक्षणाच्या सोयीसवलती देऊन सरकार तरुणांना खूष करेल. लघुउद्योजकांना यंदाच्या बजेटमध्ये मोठय़ा करसवलती मिळतील.
गुजरात आणि बिहारमधील खासदार देशाचा पंतप्रधान ठरवतील
सन २०१३ ते सन २०१७ ही वर्षे भारतवर्षांच्या दृष्टीने मोठय़ा क्रांतीची ठरणार आहेत. या चार-पाच वर्षांच्या कालावधीत दोन लोकसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतील, अशी परिस्थिती उदभवेल. सन २०१६ हे वर्ष भारत-पाकिस्तान सीमेवर सतत युद्धसदृश परिस्थिती ठेवेल. सन २०१३ मधील तुला या बौद्धिक राशीतील शनि राहूचे साहचर्य आणि या साहचर्याच्या धरून होणारी चंद्र-सूर्य ग्रहणे भारतीय राजकारणाच्या संदर्भातून ऐतिहासिक अशी प्रतिकूल फळे देणार आहेत. मार्च १३ ते मे १३ या तिमाहीत भारतात मोठा जनप्रक्षोभ पाहायला मिळेल. जनतेचा सरकारवरील विश्वास पूर्ण उडेल. ही तिमाही महाराष्ट्राला अतिशय अनिष्ट स्वरूपाची आहे. महाराष्ट्रात मोठय़ा हत्या होतील. या तिमाहीत महाराष्ट्राच्या राजकारणावर अतिशय दूरगामी असा परिणाम होणार आहे. मोठी उलथापालथ, हिंसा, आंदोलने, राजकीय नेत्यांना घेराव इत्यादीतून सनसनाटी बातम्या मथळे घेतील. नक्षलवादी कारवाया मोठी दहशत निर्माण करतील. महाराष्ट्रात मोठी शोक प्रदर्शने होतील. मे १३ महाराष्ट्रात मोठय़ा दुखवटय़ाचा राहील. सन २०१३ ते इसवी सन २०१६ हा काळ एकूणच महाराष्ट्रात आमूलाग्र क्रांती घडवेल. विशिष्ट कोर्टाचे निर्णय सन २०१३ या वर्षांत महाराष्ट्रात खरी लोकशाही आणतील. महाराष्ट्रातील जनता अदृश्य दहशतीतून मुक्त होईल. ऑगस्ट १३, सप्टेंबर १३ आणि ऑक्टोबर १३ सुरुवातीला घडणाऱ्या राजकीय घटना देशाला मध्यावधी निवडणुकांकडे नेतील. पुढील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड काळा पैसा ओतला जाईल, परंतु, काहीही उपयोग होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये गुजरात आणि बिहारमधील खासदार देशाचा पंतप्रधान ठरवतील. एखाद्या महिलेची पंतप्रधानपदासाठी चर्चा होईल, पण ती पंतप्रधान होणार नाही. ऑगस्ट १३ व सप्टेंबर १३ हे महिने स्वतंत्र तेलंगण तसेच बेळगाव कारवार सीमाप्रश्नातून पेटलेले राहतील.