आधी भाडेवाढ नंतर सुरक्षा, सोयीसुविधा व स्वच्छता यांचे स्वप्न असेच रेल्वे अर्थसंकल्पाचे विश्लेषण करता येईल. छुपी प्रवासी भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला अप्रत्यक्षपणे हात घालत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी अर्थसंकल्प सादर केला. तब्बल १७ वर्षांनंतर  काँग्रेसतर्फे रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळालेल्या बन्सल यांनी ६७ नव्या एक्स्प्रेस गाडय़ा, २६ नव्या पॅसेंजर गाडय़ांसह एकूण १०६ नव्या गाडय़ांची घोषणा केली. पण त्यांच्या अर्थसंकल्पावर विरोधी तसेच केंद्रातील मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देत असलेल्या पक्षांच्या सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून प्रचंड गोंधळ घातल्यामुळे त्यांना अर्थसंकल्पाचे भाषण कसेबसे संपवावे लागले.
रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाडय़ात वाढ केली नाही. मात्र, २२ जानेवारी रोजी केलेल्या प्रवासी भाडेवाढीतून अपेक्षित असलेल्या ६६०० कोटीपैकी ३३०० कोटी त्यानंतर झालेल्या इंधन दरवाढीत गेल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवासी भाडय़ात दरवर्षी ५ ते ६ टक्क्यांची साधारण दरवाढ केली तरी दहा वर्षांत १ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जमा होऊन सेवांमधील सुधारणांद्वारे प्रवाशांना जास्तीचे फायदे होऊ शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. इंधन दरवाढीमुळे प्रवासी भाडेवाढीपोटी भारतीय रेल्वेला ८५० कोटी रुपयांचा भरुदड सोसावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांवर भाडेवाढीचे ओझे लादणार नसल्याचे सांगताना बन्सल यांनी सुपरफास्ट गाडय़ांसाठी पूरक शुल्क, आरक्षण शुल्क, कारकुनी शुल्क, तिकीट रद्द करताना लागणारे शुल्क आणि तात्काळ तिकिटांवरील शुल्कात वाढ करून अप्रत्यक्षपणे प्रवासी भाडेवाढ केली आहे.
२००१-०२च्या तुलनेत प्रवासी गाडय़ांची संख्या ८८९७ वरून १२३३५ वर गेली, पण त्याचबरोबर २००१-०२ मध्ये ४९५५ कोटींवर असलेला रेल्वेचा तोटाही आगामी वित्त वर्षांत २४६०० कोटींवर पोहोचणार असल्याने प्रवासी सुविधा खालावत चालल्याचा दावा बन्सल यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छता, सफाई आणि प्रवाशांच्या सुविधांवर विशेष भर
*  रेल्वेस्थानकांच्या साफसफाईसाठी दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा १०४ रेल्वेस्थानकांना प्राधान्य देण्यात येईल. गाडय़ांमध्ये जैविक शौचालयांच्या संख्येत सातत्याने वाढ करण्यात येणार असून, यंत्रांद्वारे प्लॅटफॉर्मची सफाई करण्यासाठी २०० रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे.
* रेल्वेस्थानके आणि गाडय़ांमध्ये साफसफाई राखण्यासाठी योजना आखण्यात आली असून स्वच्छ गाडय़ांच्या स्थानकांचा विस्तार करण्यात येणार आहे. आधीपासून निवडण्यात आलेल्या ९८० रेल्वेस्थानकांव्यतिरिक्त ६० नव्या स्थानकांना आदर्श रेल्वेस्थानक म्हणून अद्यावत करण्यात येईल.
* तत्परतेने सफाई व्हावी म्हणून चालत्या गाडीत प्रवाशांना संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी एसएमएस, फोन कॉल्स आणि ई-मेलची निवडक गाडय़ांमध्ये सुविधा सुरू करण्यात येत आहे.
* चालू गाडीत आगामी रेल्वेस्थानक, प्लॅटफॉर्म आणि अन्य सूचना देण्यासाठी उद्घोषणा आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड लावण्यात येतील. नागपूरसह देशात सहा ठिकाणी रेल नीर बॉटलिंग संयंत्राची स्थापना करण्यात येणार आहे.
* वातानुकूलित गाडय़ांमध्ये प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या चादरी व ब्लँकेटस् व टॉवेल्सच्या धुलाईसाठी ८ ते १० यांत्रिकी धुलाई केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.
* युवक आणि व्यावसायिकांसाठी रेल्वेगाडय़ांमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात येईल. शताब्दी आणि राजधानी गाडय़ांच्या वाढत्या लोकप्रियतेसह अधिक आरामदायी प्रवासाची मागणी वाढली आहे.
* काही निवडक गाडय़ांतील काही डब्यांमध्ये उत्कृष्ट वातावरण आणि आधुनिक सेवासुविधांची व्यवस्था करण्याची संकल्पना बन्सल यांनी मांडली. अशा डब्यांचे नाव ‘अनुभूती’ ठेवण्यात येणार असून, त्यांचे प्रवासभाडे उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांनुसार असेल.
* इंटरनेटच्या सहाय्याने तिकीट काढण्याची सुविधा पहाटे साडेबारा वाजतापासून रात्री साडेअकरापर्यंत उपलब्ध करण्यात येईल. मोबाइल फोनच्या माध्यमातूनही ई-तिकीट आरक्षित करता येईल. भारतीय रेल्वेची वेबसाइट आणि ‘१३९’ अंतर्गत एकीकृत चौकशी सेवेत आरक्षणाची ताजी माहिती उपलब्ध होईल.

नवे प्रकल्प व योजना
*  २०१३-१४ मध्ये ५०० किमी नव्या रेल्वेमार्गाच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ४५० किमी लांबीच्या मीटरगेज व छोटय़ा गेजच्या रेल्वेमार्गाचे मोठय़ा रेल्वेमार्गामध्ये परिवर्तन करण्यात येईल. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे लक्ष्य वाढवून ७५० किमी करण्यात आले आहे.
*  २०१३-१४ मध्ये सात नवे रेल्वेमार्ग, १० मार्गाचे दुहेरीकरण आणि पाच मार्गाच्या विद्युतीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची बन्सल यांनी घोषणा केली. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सामाजिक-आर्थिक आधारावर २२ नवे रेल्वेमार्ग, १ दुहेरीकरण प्रकल्प आणि १ गेज परिवर्तनाचा प्रस्ताव बन्सल यांनी मांडला. ५९ नवे रेल्वेमार्ग, ५ रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन आणि २५ मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण हाती घेण्याची घोषणा बन्सल यांनी केली. बन्सल यांनी ६७ नव्या एक्स्प्रेस गाडय़ा, २६ नव्या पॅसेंजर गाडय़ा तसेच ५ मेमू आणि ८ डेमू सेवांची घोषणा केली. ५७ गाडय़ांचा विस्तार केला, तर २४ गाडय़ांच्या फे ऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
*  बाराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान देशातील ३१,८४६ लेव्हल क्रॉसिंगपैकी १०,७९७ लेव्हल क्रॉसिंग समाप्त करून भविष्यात नवे लेव्हल क्रॉसिंग निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही बन्सल यांनी दिली. स्वयंचलित सिग्नल प्रणालीवर गाडीच्या सुरक्षेसाठी इशारा देणारी प्रणाली सुरू करण्यात येईल तसेच दोन गाडय़ांमध्ये टक्कर टाळणाऱ्या प्रणालीचे परीक्षण करण्यात येईल. एकमेकांवर न चढणाऱ्या प्रवासी डब्यांचा वापर वाढविण्याचा, वर्षभरात जीर्णावस्थेत पोहोचलेल्या १७ रेल्वे पुलांची पुनस्र्थापना करण्याची तसेच प्रवासी गाडय़ांमध्ये आगीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची घोषणा बन्सल यांनी केली.
*  बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे आव्हानात्मक लक्ष्य असल्याचे बन्सल यांनी नमूद केले. रेल भूमी विकास प्राधिकरण आणि भारतीय रेल विकास मंडळासाठी एक हजार कोटींचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेवर आधारित उद्योगांची त्यांनी माहिती दिली. चालू वर्षांत ४५०० कोटींचे रेल्वेचे भंगार विकण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

मनरेगाचा ‘आधार’  
मनरेगाअंतर्गत रेल्वेशी संबंधित काही कामांमध्ये भागीदारी करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल त्यांनी ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांचे आभार मानले. आधार योजनेचा उपयोग रेल्वे मंत्रालयातही करण्याचा संकल्प बन्सल यांनी केला. आधारद्वारे निर्माण झालेल्या माहितीचा वापर रेल्वे सेवा, तिकिटांचे आरक्षण, गाडय़ांमध्ये जीपीएसवर चालणाऱ्या उपकरणांच्या मदतीने प्रवाशांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी करता येईल तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन, भत्ते यासाठीही करता येईल, असे बन्सल यांनी सांगितले. याविषयी आपली नंदन नीलेकणी यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वे उपेक्षितच
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-रत्नागिरी रेल्वेगाडी वगळता कोणत्याही योजनेसाठी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसल्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्पाच्या विस्ताराचा आणि पर्यायाने कोकणवासीयांच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकवार उपेक्षित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
मरणोत्तर महावीर चक्र, वीर चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र, शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि पोलीस पदक विजेत्या अविवाहितांच्या आईवडिलांना सन्मान म्हणून वातानुकूलित प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी प्रवासाची सुविधा प्रदान करण्यात येईल. हीच सुविधा पोलीस पदक विजेत्यांना वर्षांतून एकदा राजधानी वा शताब्दी गाडय़ांमध्ये आपल्या एका सहकाऱ्यासोबत प्रवासासाठी दिली जाईल. वृद्ध स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांना आता त्यांच्या पासचे तीन वर्षांतून एकदा नूतनीकरण करता येईल.

ठळक वैशिष्टय़े
*  इंटरनेटवरून तिकीट मिळण्याची व्यवस्था रात्री १२.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत आणि ई-तिकीट भ्रमणध्वनीवरूनही.
*  प्रस्तावित ई-तिकीट पद्धत : सध्याची दोन हजार तिकिटे प्रतिमिनिट ही क्षमता प्रतिमिनिट ७२०० तिकिटे आणि सध्याची ४० हजार तिकिटे प्रतिमिनिट ही क्षमता वाढवून ती प्रतिमिनिट १.२ लाखांवर.
मुंबई उपनगरी सेवेत २०१३-१४ मध्ये पहिली वातानुकूलित ईएमयू गाडी प्रस्तावित.
*  मुंबईत अतिरिक्त ७२ गाडय़ा आणि कोलकातामध्ये १८ अतिरिक्त गाडय़ा.
*  कोलकाता आणि चेन्नईमधील ८० गाडय़ांच्या डब्यांची संख्या नऊवरून १२ डबे.
*  नव्या ६७ एक्स्प्रेस गाडय़ा, नव्या २६ पॅसेंजर गाडय़ा, आठ डीईएमयू, पाच मेमू सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित.
*  ५७ गाडय़ांच्या प्रवास अंतरात वाढ आणि २४ नव्या गाडय़ा.
*  स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून त्वरित लक्ष देण्यासाठी १०४ स्थानके निश्चित करणार आणि ६० स्थानकांची आदर्श स्थानके म्हणून सुधारणा करणार.
*  गाडीतील शौचालये पर्यावरणास पोषक करणार.
*  अनारक्षित तिकीट पद्धत, एटीव्हीएम, नाणे टाकून वापरण्यात येणारी टीव्हीएम आणि जनसाधारण तिकीट आरक्षणसेवक पद्धत यांचा विस्तार.
*  महिलांसाठी १० टक्के राखीव जागा ठेवून रेल्वे सुरक्षा दलात भरती.
*  बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे आणखी सहा प्रकल्प उभारणार.
*  जम्मू-काश्मीर सरकारच्या सहकार्याने बहुउद्देशीय पर्यटन पॅकेज आणि महावैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा पर्ची देणार.
*  विविध वर्गातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्याशी संबंधित सेवांसाठी ‘आधार’चा वापर.
*  गाडय़ांमध्ये उद्घोषणा सुविधा आणि इलेक्ट्रॉनिक फलक बसविणार आणि अनेक गाडय़ांमध्ये वाय-फाय सुविधा.
*  कंपनी सुरक्षेचा १० वर्षांचा प्रस्ताव (२०१४-२४).
* १ एप्रिलपासून मालवाहतुकीचे दर इंधन आकाराशी निगडित.
*  १२ व्या पंचवार्षिक योजनेत १० हजार ७९७ रेल्वे फाटके बंद करणार आणि आपोआप सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी गाडी सुरक्षा इशारा पद्धत सुरू करणार.
* अपघात मदत गाडय़ा आणि दुरवस्था झालेल्या १७ पुलांची पुढील वर्षांत दुरुस्ती.
*  आग आणि धूम्रपानशोधक यंत्रणा आणि डब्यांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा बसविणार.
* खानपान सेवेवर नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती सेवा सुरू करणार व त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-१११-३२१.
*  आरक्षित आणि तात्काळ तिकिटांमध्ये सुरू असलेला गैरव्यवहार थोपविण्यासाठी पावले उचलणार.
*  प्रवाशांना एसएमएसद्वारे आरक्षणाच्या स्थितीची माहिती आणि रिअल टाइम इन्फॉर्मेशन पद्धतीत अधिकाधिक प्रवाशांना सामावून घेणार.
*  सर्वाधिक ६३ हजार ३६३ कोटी रुपयांचे २०१३-१४ चे अंदाजपत्रक, बाजारपेठेतून १५ हजार १०३ कोटी रुपये उभारणार.
*  मालाची चढउतार करण्याचे लक्ष्य १०४७ मेट्रिक टन, २२०१२-१३ च्या तुलनेत ४० मेटिक टन अधिक.
*  प्रवासी संख्येत ५.२ टक्के वाढ अपेक्षित.
*  ५०० कि.मी. लांबीचे नवे मार्ग, ७५० कि.मी.चा दुपटीने विस्तार आणि ४५० कि.मी.च्या मार्गाचे गेजमध्ये रूपांतर.
*  पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंना सवलतीच्या दराने प्रवास.
*  यंदा १.५२ लाख रिक्त जागा भरणार.
*  रेल्वे दर नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचे प्रस्तावित.
सुरक्षेच्या उपाययोजना
* गाडय़ांची टक्कर रोखणाऱ्या देशी बनावटीच्या यंत्रणेची चाचणी
*  हत्तींमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना
*  गार्ड-कम-ब्रेक व्हॅन्स, वातानुकूलित डबे आणि खान-पान सेवेमध्ये अग्निशामक यंत्रणा
*  डब्यांमध्ये आगविरोधक घटकांचा वापर
*  रेल्वे प्रवासी विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला रेल्वे सुरक्षा दलाच्या आणखी आठ कंपन्या.
नवे कारखाने / कार्यशाळा उभारणार
*  राष्ट्रीय इस्पात निगमच्या सहाय्याने रायबरेली येथे रेल्वेच्या चाकांचा कारखाना
*  राज्य सरकार आणि भेल यांच्या सहकार्याने भिलवाडा येथे मेमू उत्पादन युनिट
* सोनेपत (हरयाणा) येथे डबे तयार करण्याचे युनिट
*  बीजी वॅगन्ससाठी बिकानेर आणि प्रतापगड येथे कार्यशाळा
* मध्य प्रदेशातील मिसरोड येथे मोटारबोगीच्या दुरुस्ती आणि पुनर्रचनेचा कारखाना
*  ओदिशातील कलाहंदी येथे नवी व्ॉगन देखरेख कार्यशाळा
*  पीपीपी मार्गाचा अवलंब करून अत्याधुनिक सिग्नल उपकरण सुविधा
ग्रीन इनिशिएटिव्हज
* सौर आणि पवनऊर्जेचा वापर करण्यासाठी रेल्वे ऊर्जा व्यवस्थापन कंपनीची स्थापना.
* ७५ मेगावॅट क्षमतेचा पवनचक्की प्रकल्प उभारणार आणि सौरऊर्जेने १००० फाटकांवरील यंत्रणा कार्यान्वित करणार.
* इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आणि ईएमयू उभारणार
* खान-पान सेवेत प्लास्टिकचा वापर बंद
प्रवासी सुविधा
*  फलाटांवर स्वच्छतेच्या यांत्रिक सुविधा
*  स्वच्छतेबाबत गाडीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी निवडक गाडय़ांमध्ये एसएमएस, दूरध्वनी संपर्क ई-मेल.
* अत्याधुनिक सुविधा आणि सेवा पुरविण्यासाठी निवडक गाडय़ांमध्ये ‘अनुभूती’ डबे.
*  वयोवृद्ध आणि अपंग नागरिकांसाठी ए-१ दर्जाच्या मोठय़ा स्थानकांमध्ये १७९ सरकते जिने आणि लिफ्ट.
*  शौचालय, चाकांची गाडी सुविधा या बाबत ब्रेल स्टीकर्स लावणार आणि बॅटरीवर चालणारी चाकांची गाडी.
*  खाद्यपदार्थाच्या दर्जाची त्रयस्थ प्रयोगशाळेतून चाचणी करणार आणि त्रयस्थामार्फत ऑडिट करणार.
*  रेल्वेच्या संकुलात आयएसओ प्रमाणित उपहारगृहे उभारणार.
रेल्वे पर्यटन
* स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित ठिकाणांशी संपर्क साधण्यासाठी ‘आझादी एक्स्प्रेस’ ही सवलतीच्या दरातील शैक्षणिक पर्यटन गाडी सुरू करणार.
विलासपूर, विशाखापट्टणम, पाटणा, नागपूर, आग्रा, जयपूर आणि बंगळुरू येथे उच्चश्रेणीतील लाऊंज
कर्मचारी कल्याण योजना
*  कर्मचारी निवासस्थान निधीचे वाटप ३०० कोटी रुपयांवर.
*  एकटय़ा महिला कर्मचाऱ्यासाठी सर्व विभागीय मुख्यालयांमध्ये वसतिगृह.
*  रेल्वे पोलीस दलाच्या बराकींची सुधारणा.
प्रशिक्षण आणि भरती
* दीड लाख कर्मचाऱ्यांच्या भरतीपैकी ४७ हजार कर्मचारी दुर्बल घटक आणि अपंगांमधून भरणार.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only major announcement in railway budget