केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारचा आर्थिक वर्ष २०२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना सितारामन यांनी अनेक घोषणा केल्या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी हा अर्थसंकल्प गरिबांच्या कल्याणासाठी असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच पक्कं घर, पाणी, शौचालय आणि गॅससारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिल्याचंही मोदींनी नमूद केलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, “या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे गरिबांचं कल्याण. प्रत्येक गरिबाकडे पक्कं घरं हवं, नळातून पाणी यावं, घरी शौचालय असावं, गॅसची सुविधा असावी. या सर्व गोष्टींवर अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलंय. याशिवाय आधुनिक इंटरनेट सुविधेवरही तेवढाच भर देण्यात आला. भारताचा डोंगराळ भाग, हिमालयाचा परिसर या ठिकाणी जीवन सहज व्हावं आणि तिथून स्थलांतर होऊ नये म्हणून नव्या घोषणा करण्यात आल्या.”
“हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, इशान्य भारतासाठी देशात पहिल्यांदाच पर्वतमाला योजना”
“हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, इशान्य भारतासाठी देशात पहिल्यांदा पर्वतमाला योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेतून डोंगराळ भागात वाहतूक आणि संपर्काच्या आधुनिक सुविधांची निर्मिती करेल. यामुळे देशाच्या सीमावर्ती भागातील गावांना ताकद मिळेल. गंगा नदीच्या किनाऱ्यावर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्यामुळे गंगा नदीला केमिकलमुक्त करण्यात मदत होईल,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.
“हमीभावाने खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वा दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे थेट खात्यात जमा करण्यात आले,” असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.
“संरक्षण विभागाच्या एकूण तरतुदीपैकी ६८ टक्के निधी देशांतर्गत उद्योगांसाठी राखीव”
नरेंद्र मोदी म्हणाले, “संरक्षण विभागाच्या एकूण तरतुदीपैकी ६८ टक्के निधी देशांतर्गत उद्योगांसाठी राखीव करण्याचा मोठा फायदा भारतातील छोट्या व्यवसायांना होणार आहे. साडेसात लाख कोटी रुपयांच्या सार्वजनिक गुंतवणुकीतून अर्थव्यवस्थेला नव्या गतीसोबतच लघू उद्योगांना नव्या संधी निर्माण होतील. लोकांसाठीच्या या प्रगतीशील अर्थसंकल्पासाठी मी अर्थमंत्री सितारामन यांचं अभिनंदन करतो.”
“उद्या (२ फेब्रुवारी) भाजपाने मला अर्थसंकल्प आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर बोलायला बोलावलं आहे. त्यात मी यावर सविस्तरपणे बोलेल,” असंही मोदींनी सांगितलं.