Narendra Modi On Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या बरोबरच लघू उद्योग, शेती, उत्पादन, रोजगारासह ३६ औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता ३६ औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे, तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या विकासासाठी आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“अर्थसंकल्पात सरकारची तिजोरी कशी भरली जाईल यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. मात्र, हा अर्थसंकल्प त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देशातील नागरिकांचे खिसे कसे भरले जातील, देशातील नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशातील नागरिक विकासाचे भागीदार कसे होतील, याचं उदाहरण म्हणजे हा आजचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अत्यंत महत्त्वाची आणि ठोस पावले उचलण्यात आली आहेत. या अर्थसंकल्पात एक नाही तर अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

“आज संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प हा १४० कोटी भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेण्याचं काम करतील. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांची बचत नक्कीच वाढणार आहे. या अर्थसंकल्पामुळे देशातील विकास झपाट्याने वाढेल. ज्यामुळे विकसित भारताच्या ध्येयाला अधिक चालना मिळेल. आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळण्यासाठी नक्कीच फायदा होईल”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“जनतेची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशाची शक्ती वाढवणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल. तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा कृषी क्षेत्रात आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत नव्या क्रांतीचा आधार ठरतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणखी मदत मिळेल”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.