Railway Budget : अर्थमंत्री निर्मला सीतारामन नव्या सरकारचा नवा अर्थसंकल्प आज मांडला. महिला, युवा, गरीब, शेतकरी या चार विभागांसाठी भरीव तरतूद केल्याचं त्यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितलं. तसंच, विविध क्षेत्रासाठीही त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. दरम्यान, त्यांनी रेल्वे खात्याबाबत एक अक्षरही उच्चारला नाही. परंतु, अर्थसंकल्पाच्या कागदपत्रात याचा उल्लेख आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. फायनान्शिअल एक्स्प्रसेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२०१७ पूर्वी देशात रेल्वेचा अर्थसंकल्प (Railway Budget) स्वंतत्र सादर केला जात असे. परंतु, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही प्रथा बदलली आणि केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाऊ लागला. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आजच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय तरतूद करतात याकडे रेल्वे प्रवाशांचं लक्ष होतं. परंतु, त्यांनी त्यांच्या दोन तासांच्या भाषणात रेल्वे खात्याबाबत एकही शब्द उच्चारला नाही. रेल्वे क्षेत्रासाठी (Railway Budget) मोठ्या घोषणा होणं अपेक्षित असतानाही त्याा उल्लखही झाला नाही. २२ जुलै रोजी झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात आगामी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांसह इतर गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला होता.
हेही वाचा >> Budget 2024 : तुमच्यासाठी बजेटमध्ये काय आहे? समजून घ्या १० मुद्यांमध्ये
अर्थमंत्र्यांनी रेल्वेबाबत काहीही माहिती दिली नसली तरीही अर्थसंकल्पीय दस्ताऐवजात (Railway Budget) या क्षेत्राविषयी सांगण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांत रेल्वेवरील भांडवली खर्चात ७७% वाढ झाली आहे, सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, नवीन लाईन बांधणे, गेज रूपांतरण आणि दुहेरीकरण यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वेसाठी जलद क्षमता वाढवणे, रोलिंग स्टॉकचे आधुनिकीकरण, उर्जा कार्यक्षमता आणि बऱ्याच मुद्द्यांवर लक्षकेंद्रित करण्यात आलं आहे.
रेल्वेच्या कोणत्या कामासाठी किती निधींची तरतूद?
कामे | अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक (२०२३-२४) | अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक (२०२४-२५) |
नवे मार्ग | ३१,८५० कोटी | ३४,६०३ कोटी |
गॉज कन्वर्जन | ४ हजार ६०० कोटी | ४ हजार ७२० कोटी |
दुहेरीकरण | ३० हजार ७४९ कोटी | २९ हजार ३१२ कोटी |
रोलिंग स्टॉक | ३७ हजार ५८१ कोटी | ४० हजार ३१४ कोटी |
रुळ बदलणे | १७ हजार २९७ कोटी | १७ हजार ६५२ कोटी |
सिग्नलिंग आणि टेलिकॉम | ४ हजार १९८ कोटी | ४ हजार ६४७ कोटी |
इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट्स | ८ हजार ७० कोटी | ६ हजार ७४२ कोटी |
ग्राहक सेवा | १३ हजार ३५५ कोटी | १५ हजार ५११ कोटी |
हेही वाचा >> Budget 2024 : रेल्वेचा अर्थसंकल्प पूर्वी वेगळा का मांडला जात होता? ९४ वर्षांची परंपरा का आली संपुष्टात?
देशात पहिला रेल्वेचा अर्थसंकल्प कधी सादर झाला?
भारतातील पहिला रेल्वे अर्थसंकल्प १९२४ मध्ये ब्रिटिशांच्या कार्यकाळात सादर करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यात आले होते. खरं तर त्यापूर्वी १९२०-२१ मध्ये रेल्वेच्या विकासासंदर्भात सर विल्यम ऍक्वर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीने रेल्वेचा अर्थसंकल्पात स्वतंत्र मांडण्यात यावा, अशी शिफारस केली होती. त्यानंतर १९२४ पासून दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जाऊ लागला. ही प्रथा २०१६ पर्यंत सुरू होती.