Stock Market Today for Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बाजार उघडताच तेजी पाहायला मिळाली. जागितक बाजारात सकारात्मक संकेत दिसत आहेत. त्यामुळे २३ जुलै रोजी सकाळी निफ्टी २४,५५० वर उघढला तर सेन्सेक्समध्येही १९३.३५ अंकाची वाढ होऊन तो ०.२४ टक्क्यांनी अधिक वाढ घेऊन ८०,६९५ वर उघडला. यावेळी १६१५ शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. तर ७३३ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. अर्थसंकल्प सादर होताच बीएसई सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्समध्ये १००० अंकाची घसरण झाली आहे. यामुळे ८० हजारांवर गेलेला निर्देशांक आज खाली आला. तर एनएसई निफ्टीमध्ये ३०० अंकाची घसरण होऊन निर्देशांक २४,२०० वर आला.
शेअर बाजार उघडताच थोडी तेजी दिसल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसली. सकाळी हिरव्या रंगात दिसणारे आकडे लाल झाले. सकाळी १०.१६ वाजता शेअर बाजारात लाल रंग दिसायला लागला. सेन्सेक्समध्ये १८०.८५ अंकाची घसरण झाली. ०.२२ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्सचा निर्देशांक ८०,३२१.२३ वर आला. तर निफ्टीमध्ये ७१.५५ अंकाची घसरण होऊन ०.२९ टक्क्यांच्या तुटीसह तो २४,४३७.७० वर आला.
तज्ज्ञांच्या मतानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअरबाजारात अनेकदा चढ उतार पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त आशियाई देशांतील शेअर बाजारांवर नजर टाकल्यास, त्यांच्यात आज मोठी घसरण दिसून आलेली आहे. जपानचा निक्केई निर्देशांक ०.२० टक्क्यांनी वर आहे. तर हाँगकाँगचा हँग सेंग ०.१२ टक्क्यांनी खाली आला आहे. चीनचा शांघाय कंपोझिट ०.५१ टक्क्यांनी खाली आला आहे.
हे ही वाचा >> अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटची परिस्थिती कशी असते? जाणून घ्या मागच्या १० वर्षांतील इतिहास
सकाळी ११.०९ वाजता निर्मला सीतारमण यांनी भाषण सुरू केल्याच्या काही मिनिटांनंतरच सेन्सेक्समध्ये पुन्हा तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये १०० अंकानी वाढ झाली. यावेळी सेन्सेक्स पुन्हा ८०,६०४ आणि निफ्टी निर्देशांक २४,५२०.६५ वर पोहोचला.
सकाळी ११.२६ वाजता शेअर बाजार पुन्हा लाल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण विविध क्षेत्रासाठी घोषणा करत असताना सकाळी ११.२६ वाजण्याच्या सुमारास बाजारात पुन्हा एकदा लाल रंग दिसला. बीएसई सेन्सेक्समध्ये १५० अंकाची घसरण पाहायला मिळाली. तर एनएसई निफ्टीही २२,५०० च्या खाली गेला.