अर्थशास्त्रज्ञांपेक्षा ‘मॅंगो पीपल’ म्हणजेच सर्वसामान्य नागरिकच आगामी अर्थसंकल्प कसा असेल, या विचाराने सध्या बेचैन आहेत. गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे सामान्यांच्या घरचे ‘बजेट’ पुरते कोलमडल्याचे चित्र असताना, आता पुढील आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातून तरी दिलासा मिळेल, अशी त्याला अपेक्षा आहे. खरंच या अर्थसंकल्पातून त्याला दिलासा मिळेल का? ग्रह-तारे त्याला साथ देतील का, याचा वर्तविलेला अंदाज…
पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शुक्र मीन राशीत मंगळ आणि रविबरोबर असेल. त्याचवेळी गुरू वृषभ राशीमध्ये तर ऐश्वर्य, आनंद आणि व्यापाराची रास असलेल्या तूळमध्ये पहिल्यापासून शनी विराजमान आहे. तिथं राहून ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढील काळ कठीण असल्याचेच संकेत देताहेत. एप्रिल महिन्यात पराभव नावाच्या संवत्सराचा प्रारंभ होतो आहे. त्यावेळी गुरु, बुध राजाच्या भूमिकेत तर शनि मंत्र्याच्या भूमिकेत असेल. अर्थसंकल्पात कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती आणि परदेशी गुतंवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुरुमुळे करपात्र उत्पन्नाची मर्यादाही वाढेल, असे दिसते.
रवि सुते यदि मंत्रिणी पार्थिवा विनय संरहिता बहुदुः खदाः
न जलदा जलदा जनता पदा जन पदेषु सुखं, धनजं क्वचित्
म्हणजेच रविपुत्र शनीदेव मंत्री झाले, तर राजाची विनम्रता नष्ट होते. तो जनतेबरोबर क्रूरपणे व्यवहार करू लागतो. लोकांची क्रयशक्ती कमी होऊ लागते आणि त्यांना धनप्राप्ती होत नाही. पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळ पडतो.
रविसुते गढपालिनी विग्रहो सकल देशगताश्चलिता जना:
विविध वैरविशेषितनागरा: कृषिधनं न लभेभ्द्रुवि कश्चन
म्हणजेच दुर्गेश शनी असेल, तर लोकांमध्ये बेचैनी, अन्नधान्याच्या कमतरतेमुळे दरवाढ आणि व्यापाऱयांमध्ये वैरभावना जागृत होते.
फायदा घटण्यास तुळेचा शनी कारणीभूत ठरतो. केंद्र सरकारचा वित्तीय तोटा कमी होण्याची कोणतीही शक्यता तूर्त दिसत नाही. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीही हा अर्थसंकल्प फारसा आशावादी वाटत नाही. या क्षेत्रातील कंपन्यांना नव्या समस्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
शनीचे शुक्राच्या राशीत राहूबरोबर असलेल्या उपस्थितीमुळे धातूविषयक उद्योगांसाठी अर्थसंकल्पात सकारात्मक संकेत मिळतात. बुध सध्या कुंभ राशीत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल. मात्र, खासगी बॅंकांवर दबाव वाढण्याचा अंदाज आहे. येणारे आर्थिक वर्ष बॅंकांसाठी खूप फायदेशीर नक्कीच वाटत नाही. सध्याच्या ग्रहस्थितीमध्ये दूरसंचार क्षेत्रालाही अर्थसंकल्पातून फार काही मिळणार नाही. एफएमसीजी क्षेत्राचा फायदाही नाही आणि तोटाही नाही, अशी स्थिती राहील. साखरउद्योग, वस्त्रोद्योग आणि सरकारी गॅस कंपन्या यांना अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे फायदा होईल. जेनेरिक औषधांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येईल. सोन्यावरील कर हळूहळू वाढविण्यात येईल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याचे संकेत आहेत. हवाई वाहतुकीचे भाडे सुरुवातीला काही महिने कमी असेल, मात्र, नंतर त्यात सुद्धा वाढच होईल.
यदि गुरौ रसपे जन सौख्यदं कमलवंति सरांसि तृणिनिच
जनपदा द्विज पूजनतत्परा बहुगजवाजिर थोष्ट्रयुता नृपा:
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला दिलासा मिळण्याची अपेक्षा नक्कीच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा