नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्यासाठी एकूण ९० हजार ९५८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०२३-२४च्या सुधारित अंदाजापेक्षा यंदा त्यामध्ये १२.९६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. २०२३-२४च्या सुधारित अंदाजामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी ८०,५१७.६२ कोटी निधी दिला होता. यापैकी ८७,६५६.९० कोटी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला तर ३,३०१.७३ कोटी आरोग्य संशोधन विभागाला दिले जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्राद्वारे निधी प्रदान केल्या जाणाऱ्या योजनांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य उपक्रम, स्वायत्त संस्था यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानासाठीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वेळी २,२९५.१२ कोटींची तरतूद होती. ती आता २,७३२.१३ इतकी आहे.

हेही वाचा >>> Union Budget 2024 : अर्थसंकल्पात ऑटो क्षेत्रासाठी तब्बल ३५०० कोटींची तरतूद

कर्करोग रुग्णांना दिलासा

कर्करोगावर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या ‘ट्रास्टुझुमाब डेरुक्स्टेकॅन’, ‘ओसिमर्टिनिब’ आणि ‘डुर्वालुमाब’ या तीन औषधांवरील सीमा शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे. या औषधांचे उत्पादन अॅस्ट्राझेनेका या कंपनीद्वारे केले जाते आणि सध्या त्यांची निर्यात करावी लागते असे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या कर्करोगाचे तज्ज्ञ डॉ. श्याम अग्रवाल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. या तिन्ही औषधांवर सध्या १० टक्के सीमा शुल्क द्यावे लागते, ते रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाचे वैद्याकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. तसेच टप्प्याटप्प्याने उत्पादन उपक्रमाअंतर्गत वैद्याकीय क्ष-किरण यंत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्ष-किरण नळ्या आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरच्या सीमा शुल्कामध्येही कपात करण्याचा प्रस्ताव आहे.

हेही वाचा >>> Budget 2024 : आंध्र प्रदेशमधील कंपन्यांना बाजारात झळाळी

● राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी २०२३-२४मध्ये ३१,५५०.८७; यंदा ३६ हजार कोटी

● प्रधानमंत्री जन आरोग्य योजना निधीत ५०० कोटींची वाढ; ७,३०० कोटींची तरतूद

● राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य उपक्रमासाठी ९० कोटी; २५ कोटींची वाढ

● ‘आयसीएमआर’च्या निधीमध्ये वाढ

● राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची तरतूद २०० कोटी

● स्वायत्त संस्थांच्या एकूण निधीमध्ये ७६२.७२ कोटींनी वाढ; १८,०१३.६२ कोटींची तरतूद

● ‘एम्स दिल्ली’ची तरतूद ४,२७८ कोटींवरून वाढवून ४,५२३ कोटी

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2024 health ministry allocated rs 90958 crore zws