Union Budget 2025 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यातली सर्वात मोठी घोषणा ठरली ती १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची. सरकार अशा प्रकारचा निर्णय घेईल अशी अपेक्षा नसताना हा निर्णय झाला आहे. हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा आहे यात शंकाच नाही. याशिवाय महत्त्वाच्या घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात केल्या. आपण त्यातल्या महत्वाच्या घोषणा कुठल्या ते जाणून घेणार आहोत.
नवीन करप्रणालीनुसार प्राप्तीकरात मोठा बदल
नवीन करप्रणालीनुसार प्राप्तीकराच्या टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या करप्रणालीनुसार १२ लाखांपर्यतच्या वार्षिक उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही असं जाहीर करण्यात आलं आहे. ही या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा आहे यात शंकाच नाही.
नव्या करप्रणालीनुसार कर कसा लागणार?
० ते ४ लाख रुपये उत्पन्न- कर नाही
४ ते ८ लाख रुपये उत्पन्न- ५ टक्के कर
८ ते १२ लाख रुपये उत्पन्न- १० टक्के कर
१६ ते २० लाख रुपये उत्पन्न- २० टक्के कर
२० ते २४ लाख रुपये किंवा त्यावरील उत्पन्न- ३० टक्के कर
मध्यवर्गीयांसाठी कुठल्या घोषणा?
TDS मर्यादा १० लाख रुपये करण्यात आली आहे, ज्याचा मध्यवर्गीय नोकरदारांना फायदा होणार आहे.
पुढील आठवड्यात देशात नवीन प्राप्तीकर विधेयक आणलं जाईल.
महिलांना काय गिफ्ट?
SC-ST च्या MSME महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना आणली जाणार, पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्याची तरतूद
ज्येष्ठ नागरिकांसाठी काय तरतूद?
ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट, ५० हजारांवरून एक लाख रुपये
३६ जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त.
वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होतील.
शेतकऱ्यांना काय दिलं बजेटने?
किसान क्रेडिट कार्ड (KCC) मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, पुढील आठवड्यात नवीन प्राप्तीकर विधेयक आणले जाईल. आम्ही निर्यात क्षेत्रात योजना सुरू करू. एमएसएमईंना परदेशात टॅरिफ सहाय्य मिळेल. पुढील आठवड्यात नवीन विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणा नंतर स्पष्ट केल्या जातील. विमा क्षेत्रासाठी एफडीआय मर्यादा वाढवणार आहे अशाही घोषणा त्यांनी केल्या. करदात्यांना दिलासा आणि शेतकरी, तसंच वृद्धांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प होता असंच म्हणता येईल.