नवी दिल्ली : दहा वर्षांपूर्वीपर्यंत सामाजिक न्याय म्हणजे केवळ राजकीय घोषणा होती. आता मात्र, विकास योजनांमधील भ्रष्टाचार, घराणेशाही बंद झाली आहे. विकास लाभार्थीपर्यंत पोहोचू लागला आहे. म्हणूनच २०१४ मध्ये आपण कुठे होतो आणि २०२४ मध्ये कुठे आहोत, हे स्पष्ट करणारा भारताच्या आर्थिक विकासाचा तुलनात्मक आढावा श्वेतपत्रिकेद्वारे लोकांसमोर मांडला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखानुदानाच्या भाषणात दिली.
हेही वाचा >>> उच्च न्यायालयात दाद मागा!, ज्ञानवापी मशीद समितीला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सीतारामन यांनी भाषणामध्ये दहा वर्षांतील पायाभूत सुविधांच्या तसेच, कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये विकास पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचा दावा केला. त्यासाठी सीतारामन यांनी ‘सेक्युलॅरिझम इन ॲक्शन’ असा शब्दप्रयोग करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
कोणाचीही सामाजिक पार्श्वभूमी न बघता सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
करोनासारख्या साथरोगाच्या संकटानंतर नवी जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या काळात भारताच्या नेतृत्वक्षमतांचे जगभर कौतुक झाले. नव्या जागतिक रचनेमध्ये भारताला कळीचे स्थान असेल. – निर्मला सीतारामन, अर्थमंत्री