केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतातच शेअर बाजारात मोठी पडझड बघायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये १००० अंकाची घसरण झाली आहे, यामुळे ८० हजारांवर गेलेला निर्देशांक आज खाली आला. तर निफ्टीमध्येही ४०९ अंकाची घसरण झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होताच गुंतवणूकदारांची शेअर मार्केटकडे पाठ का फिरवली, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये झालेल्या पडझडीचे मुख्य कारण म्हणजे सरकारने भांडवली नफ्यावरील कराच्या नियमात केलेला बदल आहे. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना भांडवली लाभ करात मोठा बदल केला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या वित्तीय मालमत्तेवरील दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर अल्पकालीन भांडवली नफा (STCG) कर १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे.
हेही वाचा – Budget 2024 : विदेशी वित्त संस्था पळ काढत असताना भारतीय संस्थांनी सावरला शेअर बाजार
महत्त्वाचे म्हणजे अल्पकालीन भांडवली नफ्यावरील (STCG) कराची मर्यादाही १ लाख रुपयांवरून १.२५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडींगवरील सेक्युरीटी ट्राझंक्शन कराच्या दरातही वाढ करण्याचा प्रस्ताव निर्मला सीतारमण यांनी ठेवला आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Angel Tax म्हणजे काय? केंद्र सरकारने हा कर रद्द का केला?
याशिवाय जर सूचीबद्ध वित्तीय मालमत्ता एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ ठेवल्या गेली तर ती दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून गणली जाईल. जर सूचीबद्ध नसलेली आर्थिक किंवा गैर-वित्तीय मालमत्ता दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी ठेवली असेल तर ती दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाईल, अशी घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली आहे. शिवाय, शेअर्सच्या बायबॅकमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.