Old Tax Regime : निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना करप्रणालीत आज काही बदल केले आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. नवी कररचना आणि जुनी कररचना अशी दोन्ही स्वीकारलेल्या करदात्यांना दिलासा मिळाला आहे. आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जुनी कररचना Old Tax Regime बाद करणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, “विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. आमचा भर रोजगार आणि कौशल्यावर आहे. सुधारणावादी धोरणांवर भर आहे.”

हे पण वाचा- Budget 2024 Gold Rate Today : अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तोळ्यामागे दर किती?

“विकसित भारतासाठी आमची पहिली प्राथमिकता कृषी क्षेत्रातील उत्पादकता आहे. दुसरं प्राधान्य म्हणजे, रोजगार आणि कौशल्य. तिसरं प्राधान्य सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय आहे, चौथं प्राधान्य उत्पादन आणि सेवा आहे. पाचवं प्राधान्य शहरी विकासाला चालना देणं हे आहे. सहावं प्राधान्य ऊर्जा सुरक्षा आहे. सातवं प्राधान्य म्हणजे, पायाभूत सुविधा, त्यानंतर आठवं प्राधान्य नवकल्पना, संशोधन आणि विकास असून नववं प्राधान्य म्हणजे, पुढच्या पिढीतील सुधारणा. या प्राधान्यांच्या आधारे आगामी अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. ” असंही सीतारमण यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या शेवटी त्यांनी कर प्रणाली Income Tax Slab जाहीर केली. ज्यानुसार ३ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही.

अशी आहे नवी करप्रणाली

नवी करप्रणाली कशी असेल? (वार्षिक उत्पन्नानुसार)

०-३ लाख- कुठला कर नाही
३-७ लाख – ५ टक्के
७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर

जुनी कररचना बंद होणार का?

हे त्यांनी मुख्य अर्थसंकल्पात जाहीर केलं. त्यानंतर पुढील वर्षी Old Tax Regime म्हणजेच जुनी कररचना संपुष्टात येईल का? असं विचारण्यात आलं त्यावर त्या म्हणाल्या, “जुन्या कर रचनेबाबत मी आत्ता सांगू शकत नाही. मात्र आमचं ठरलं आहे की कररचना ही साधी आणि सोपी असली पाहिजे. त्यामुळे आम्ही त्या दिशेने पाऊल टाकलं आहे. आमचा उद्देश हाच आहे की जुन्या कररचनेच्या मार्गावरच ही नवी कररचना प्रणाली आम्ही आणली आहे. आम्ही आढावा घेतल्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ. आत्ता आम्ही तूर्तास कुठलाही निर्णय घेतलेला नाही.” असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. नवी कर प्रणाली लोकांना आवडते आहे. तरीही अनेक लोक जुन्या कर प्रणालीत Old Tax Regime आहेत. लोकांचा काय कौल आहे त्याचा आम्ही आढावा घेऊ असं म्हणत त्यांनी जुनी कररचना बंद करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will old tax regime be scrapped next year what finance minister said scj