Union Budget 2025 Bihar Connection: चालू वर्षात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी विशेष तरतूद केली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बिहारची सांस्कृतिक ओळख असलेली मधुबनी साडी नेसून आल्या होत्या. अर्थसंकल्प सादर करण्यास सुरू झाल्यानंतर पहिल्या पाचच मिनिटात सीतारमण यांनी बिहारमध्ये मखाणा बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी तयार केलेली मधुबनी कलेने समृद्ध असलेली साडी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेट दिली होती. दुलारी देवी २०२१ च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी मधुबनीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली होती. अर्थसंकल्प सादरीकरणासाठी अर्थमंत्री सीतारमण यांच्या साडीच्या निवडीकडे सातत्याने लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.

मखाणा बोर्ड

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मखाणा बोर्डची स्थापना करण्याची घोषणा करताना म्हटले की, हे बोर्ड मखाणा उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तसेच बिहारमध्ये खाद्य प्रक्रिया संस्था उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

पाटणा आयआयटीचा विस्तार

याबरोबरच पाटणा येथील आयआयटीचा विस्तार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. पाटणा आयआयटीसह पाच संस्थांचा विस्तार होणार असून त्यात ६,५०० विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे.

विमानतळाचा विस्तार

बिहारमधील ग्रीनफिल्ड आणि पाटणा विमानतळाचा विस्तार केला जाणार असल्याचेही निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पावेळी जाहीर केले.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With eyes on bihar polls nirmala sitharaman presents budget in madhubani saree makhana board patna airport iit expansion kvg