मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ तिमाहीत निव्वळ नफ्यात १५ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. व्यवसाय विस्तारासाठी केलेल्या उसनवारीवर व्याज व अन्य शुल्कापोटी खर्चातील वाढ आणि घसारा या घटकांनी तिमाही नफ्याला कात्री लावली आहे.
तेल ते किराणा आणि दूरसंचार ते डिजिटल सेवांपर्यंंत विस्तारलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सरलेल्या डिसेंबर तिमाहीत १५,७९२ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. मागील आर्थिक वर्षात याच ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने १८,५४९ कोटी रुपये नफा कमावला होता. वार्षिक तुलनेत नफा घटला असला, तरी जुलै-सप्टेंबर २०२२ या आधीच्या तिमाहीतील १३,६५६ कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत १५ टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीने १५ टक्क्यांच्या वाढीसह डिसेंबर तिमाहीअखेर २४०,९६३ कोटी रुपयांच्या एकूण महसूल नोंदविला आहे. डिजिटल सेवांची मिळकत २६ टक्क्यांनी वाढून १२,९०० कोटी रुपयांवर गेला आहे, ज्यात जिओ या दूरसंचार सेवेच्या नफ्यात २८.६ टक्क्यांनी वाढ होऊन तो ४,८८१ कोटी रुपयांवर गेला आहे. किराणा व्यवसायाची मिळकत २५ टक्क्यांनी वाढून ४,७८६ कोटींवर गेली आहे. ‘ओ२सी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायाची मिळकतीत ३ टक्क्यांची वाढ होऊन ती १३,९२६ कोटी रुपये झाली आहे.
सर्व व्यवसायांमध्ये विस्तारीत स्वरूपात मालमत्तांचा वापर आणि डिजिटल सेवा व्यवसायात ग्राहकांना सेवा देणाऱ्या स्थानिक भागीदारांच्या मोठ्या जाळे विणले गेल्यामुळे रिलायन्सचा एकूण घसारा खर्च डिसेंबर तिमाहीत ३२.६ टक्क्यांनी वाढून १०,१८७ कोटी रुपये झाल्याचे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून स्पष्ट होते
कर्जभार वाढून ३.०३ लाख कोटींवर
कंपनीवरील कर्जावरील व्याज व अन्य शुल्कापोटी खर्च तिमाहीत ३६.४ टक्क्यांनी वाढून ५,२०१ कोटी रुपये झाला, तर इतर खर्च देखील ५,४२१ कोटी रुपयांनी वाढले. दूरसंचार आणि किराणा व्यवसायात मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही ‘हरित ऊर्जे’चा अवलंब करण्यासाठी धडाका आणि व्यवसाय विस्तारासाठी कंपनी उसनवारीतून मोठी गुंतवणूक करीत आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीवरील एकूण कर्जभार ३,०३,३५० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो डिसेंबर २०२१ अखेर ५९,००० कोटी रुपये होता.