भारतात श्रीमंताची संख्या वाढत चालली असली तरी भारताला सोडून जाणाऱ्या श्रीमंत कोट्यधीशांचीही संख्या वाढत आहे. यावर्षी ४,३०० भारतीय कोट्याधीश नागरिक भारताला राम राम ठोकून इतर देशात जाणार असल्याचा ताजा अहवाल समोर आला आहे. यापैकी बरेचसे धनाढ्य आखाती देशांची निवड करण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. लंडनच्या ‘हेन्ली अँड पार्टनर्स’ या गुंतवणूक सल्लागार संस्थेने या संबंधी एक अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये ही माहिती दिली.

मागच्यावर्षी ५,१०० कोट्यधीश भारतीय नागरिक देश सोडून इतर देशांत स्थलांतरित झाले होते, असा अहवाल याच संस्थेने दिला होता. वेगाने अर्थव्यवस्थेत प्रगती होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. चीन आणि युकेनंतर कोट्यधीशांचे स्थलांतर होणाऱ्या देशांमध्ये भारताचा आता तिसरा क्रमांक लागत आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताना चीनलाही मागे टाकले आहे. मात्र कोट्यधीशांच्या संख्येत भारत अजूनही चीनच्या मागे आहे. भारतात चीनपेक्षा ३० टक्के कमी कोट्यधीश आहेत.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये करतोय १४०० कोटींची गुंतवणूक

भारत दरवर्षी हजारो कोट्यधीश गमवत आहे. यातील बरेचसे लोक आखाती देशांना आपलेसे करत आहेत. कोट्यधीश भारताबाहेर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर ते संपत्तीचेही स्थलांतर करतात. स्थलांतरामुळे अनेक कोट्यधीश नागरिक भारताने गमावले असले तरी आर्थिक प्रगतीचा वेग वाढल्यामुळे आणखी कोट्यधीश निर्माण करण्यात भारताला यश आलेले आहे, असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.

या अहवालात असेही नमूद केले आहे की, कोट्यधीश नागरिक स्वतः जरी स्थलांतरीत होत असले तरी त्यांच्या व्यवसायाचे केंद्र आणि त्यांचे भारतातील घर मात्र कायम ठेवत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक घेवाणदेवाण सोपे जाते.

कोट्यधीशांच्या स्थलांतराचे महत्त्व काय?

जगभरातील १,२८,००० कोट्यधीश नागरिक २०२४ या वर्षात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत आहेत. युएइ आणि युएसए या देशांमध्ये कोट्यधीश स्थलांतरित होण्यास प्राधान्य देत आहेत. स्थलांतर करण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, करांमध्ये सवलत, निवृत्तीनंतरचे आयुष्य, नव्या व्यावसायिक संधी, चागंल्या जीवनमानाची अपेक्षा, मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी, आरोग्याच्या सुविधा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य जगण्यासाठी कोट्यधीश स्थलांतरित करत आहेत.

Story img Loader