Banks Fixed Deposit Intrest Rates 2025 : गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि फारसा धोका नसलेला मार्ग म्हणजे एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) असं सर्वसाधारणपणे प्रत्येकाचं मत असतं. जे लोक बांधकाम क्षेत्र, शेअर मार्केट, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायला घाबरतात ते एफडीकडे आशेने पाहत असतात. ज्यांना गुंतवणूक करताना जोखीम नको असते असे लोक एफडीकडे वळतात. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये एफडीवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात घटले आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक हे एक प्रकारचं आर्थिक नुकसान आहे, असं आर्थिक सल्लागार सांगतात. त्याऐवजी बांधकाम क्षेत्र, शेअर मार्केट, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
मात्र, एफडीमध्ये पैसे सर्वात सुरक्षित असतात हे सत्य देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळे आजही एफडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. त्यामुळे तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांची माहिती देणार आहोत ज्या बँका एफडीवर जास्तीत जास्त व्याज देतात.
पाच वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप पाच बँका
१. फेडरल बँक
फेडरल बँक त्यांच्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के व्याज ऑफर करत आहे. याचाच अर्थ तुम्ही या बँकेत पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये ठेवले तर तुम्हाला पाच वर्षांनी गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर (एफडी मेच्यॉर झाल्यानंतर) ७,१०,८७३ रुपये मिळतील.
२. एचडीएफसी बँक
देशातील सर्वात मोठी खासगी बँक अशी ओळख असलेली एचडीएफसी बँक त्यांच्या ग्राहकांना एफडीवर ७ टक्के व्याज देत आहे. या बँकेत तुम्ही पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये एफडी स्वरुपात गुंतवले तर बँक तुम्हाला पाच वर्षांनी गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर बँक ७,०७,३८९ रुपये देईल.
३. बँक ऑप बडोदा
बँक ऑप बडोदा त्यांच्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर ६.८ टक्के व्याज देत आहे. याचाच अर्थ तुम्ही या बँकेत पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये ठेवले तर तुम्हाला पाच वर्षांनी म्हणजेच गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर ७,००,४६९ रुपये मिळतील.
४. युनियन बँक
युनियन बँक त्यांच्या ग्राहकांना एफडीवर ६.५ टक्के व्याज देत आहे. या बँकेत तुम्ही पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये एफडी स्वरुपात गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षांनी गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर बँक ६,९०,२१० रुपये देईल.
५. कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक त्यांच्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर ६.२ टक्के व्याज देत आहे. याचाच अर्थ तुम्ही या बँकेत पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षांनी गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर ६,८०,०९३ रुपये मिळतील. इकोनॉमिक टाइम्सने ही यादी प्रसिद्ध केली आहे.