अठराव्या लोकसभेतही मोदी सरकार बहुमत स्थापन करणार असल्याचे अंदाज शुक्रवारी विविध एक्झिट पोलनी वर्तविले. त्यानंतर आज सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आज बाजाराने विक्रमी अशी उसळी घेत सुरुवात केली. यामध्ये विशेष करून अदाणी समूहाच्या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकासासाठी उपाययोजना केल्यानंतर
अब्जाधीश गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील १० कंपन्यांच्या समूहाने खाणकाम, बंदरे, ऊर्जा आणि वायू या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे.
या शेअर्समध्ये तेजी
सोमवारी बाजार उघडताच अदाणी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये १२.८ टक्क्यांची विक्रमी वाढ पाहायला मिळाली. तर अदाणी पॉवरने १८ टक्क्यांची उसळी घेतली. अंबुजा सिमेंटमध्ये ७ टक्क्यांची वाढ झालेली दिसली. तीनही शेअर्समध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर शेअर बाजारात विक्रमी उसळी; सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी सुरुवात
अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्सही जवळपास १० टक्क्यांनी वधारले. तर अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या अदाणी ग्रीन कंपनीचे शेअर्स १४ टक्क्यांनी वाढले. जानेवारी २०२३ नंतरची ही सर्वात मोठी वाढ असल्याचे निदर्शनास आले आहे.
मेहता इक्विटीजचे ज्येष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, जर विद्यमान सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळाल्यास आगामी काळात पायाभूत सुविधांचा मोठा विकास पाहायला मिळेल. अदाणी समूहातील अनेक कंपन्या पायाभूत क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते.
निफ्टी ५० निर्देशांकात आज अदाणी पोर्ट्स आणि अदाणी एंटरप्रायजेस हे दोन शेअर्स नफा मिळवून देणाऱ्या सर्वात वरच्या दहामधील शेअर्सपैकी होते. शुक्रवारच्या एक्झिट पोलनी मोदी सरकार तिसऱ्यांदा बहुमतात सरकार स्थापन करणार असल्याचे अंदाज आल्यानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उच्चांक पाहायला मिळाला.
सेन्सेक्ससाठी आजचा विक्रमी दिवस, रेकॉर्डब्रेक उसळीसह बंद होतानाही मोठी झेप; गुंतवणूकदार मालामाल!
२०१९ च्या तुलनेत निर्देशांकात दुपटीने वाढ
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तुलना केल्यास बाजाराचा निर्देशांक जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. या काळात अदाणी समूहाच्या शेअर्शने गगनभरारी घेतली असून त्यांच्यात ३०० टक्के ते ४५०० टक्क्यांची वाढ झालेली दिसत आहे.
गौतम अदाणी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत अदाणी यांच्यांकडे १११ अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर मुकेश अंबानी यांच्याकडे १०९ अब्ज डॉलर्सची संपत्ती असून ते श्रीमंताच्या यादीत १२ व्या स्थानी आहेत.
शुक्रवारी अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. अदाणी समूहाच्या १० कंपन्याच्या एकूण शेअर्सची किंमत १७.५ लाख कोटींवर पोहोचली आहे. ६१ वर्षीय गौतम अदाणी २०२२ मध्ये पहिल्यांदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. मात्र जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गच्या अहवालानंतर त्यांची या स्थानावरून घसरण झाली होती. आता ते पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.