SpaceX to offer Satellite Internet Services : एअरटेलने भारतातील ग्राहकांसाठी स्टारलिंकची हाय-स्पीड इंटरनेट सेवा आणण्यासाठी एलॉन मस्कच्या स्पेसएक्ससोबत करार केला आहे. एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील हा पहिला करार आहे. यामुळे स्पेसएक्सला भारतात स्टारलिंकची उपकरणे विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
एअरटेलच्या रिटेल स्टोअर्समध्ये एअरटेल आणि स्पेसएक्स स्टारलिंक उपकरणे, व्यावसायिक ग्राहकांना एअरटेलद्वारे स्टारलिंक सेवा, भारतातील अगदी ग्रामीण भागातही समुदाय, शाळा आणि आरोग्य केंद्रे जोडण्याच्या संधींचा शोध घेतील, असे भारतीय दूरसंचार कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
“भारतातील एअरटेल ग्राहकांना स्टारलिंक ऑफर करण्यासाठी स्पेसएक्ससोबत काम करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि पुढील पिढीच्या उपग्रह कनेक्टिव्हिटीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असे भारती एअरटेल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले.
दुर्गम भागात प्रगत इंटरनेट प्रणाली पोहोचवणारी कंपनी
स्पेसएक्सच्या मालकीची स्टारलिंक ही एक उपग्रह इंटरनेट कंपनी आहे जी जागतिक मोबाइल ब्रॉडबँड ऑफर करण्याचा प्रयत्न करते. जगातील सर्वात प्रगत इंटरनेट प्रणालीच्या मदतीने स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉल, ऑनलाइन गेमिंग, रिमोट वर्किंग आणि बरेच काही अगदी दुर्गम ठिकाणी देखील शक्य आहे.
दुर्गम भागातही मिळणार हाय स्पीड ब्रॉडबँड
“या सहकार्यामुळे भारतातील सर्वात दुर्गम भागातही जागतिक दर्जाचा हाय-स्पीड ब्रॉडबँड पोहोचवण्याची आमची क्षमता वाढते, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती, व्यवसाय आणि समुदायाकडे इंटरनेट उपलब्ध होईल. स्टारलिंक आमच्या भारतीय ग्राहकांना प्रत्येक कोपऱ्यात विश्वसनीय आणि परवडणारे ब्रॉडबँड सुनिश्चित करण्यासाठी एअरटेलच्या उत्पादनांच्या संचाला पूरक असेल”, असं विट्टल यांनी निवेदनात म्हटले आहे.
Airtel announces an agreement with SpaceX to bring Starlink’s high-speed internet services to its customers in India. This is the first agreement to be signed in India, which is subject to SpaceX receiving its own authorizations to sell Starlink in India. pic.twitter.com/9RMQc4j3XZ
— ANI (@ANI) March 11, 2025
स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वेन शॉटवेल म्हणाले की, एअरटेलच्या टीमने भारताच्या दूरसंचार इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे स्पेसएक्सच्या थेट ऑफरला पूरक म्हणून त्यांच्यासोबत काम करणे व्यवसायासाठी खूप अर्थपूर्ण आहे.
“एअरटेलसोबत काम करण्यास आणि स्टारलिंक भारतातील लोकांवर आणू शकणारा परिवर्तनकारी प्रभाव उघड करण्यास आम्ही उत्सूक आहोत. स्टारलिंकद्वारे जोडलेले लोक, व्यवसाय आणि संस्था ज्या अविश्वसनीय आणि प्रेरणादायी गोष्टी करतात त्या पाहून आम्हाला सतत आश्चर्य वाटते”, असे ग्वेन शॉटवेल म्हणाल्या.
मुकेश अंबानींना टफ फाईट
मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ सध्या भारतातील ब्रॉडबँड बाजारपेठेत १.४ कोटींहून अधिक वायर्ड सबस्क्राइबर्ससह वर्चस्व गाजवत आहे. जिओकडे जवळपास ५० कोटी मोबाइल इंटरनेट वापरकर्ते आहेत. एअरटेलचेही जवळपास ३० कोटी ब्रॉडबँड सबस्क्राइबर्स आहेत. तथापि, स्पेक्ट्रम लिलावात २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केल्यानंतर, त्यांना आता सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एलॉन मस्कच्या स्टारलिंकमुळे ग्राहक गमावण्याचा धोका आहे याची त्यांना चिंता आहे.