Anil Ambani Company Banned: अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजार उघडताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ३ ऑक्टोबर रोजी रिलायन्स पॉवरचा शेअर ५४ रुपयांवर गेला होता. मात्र कारवाईनंतर आता शेअरची किंमत पडली असून आज तो ४१.४७ रुपयांवर आला. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स NU BESS लिमिटेड या कंपनीला तीन वर्षांसाठी सरकारी कंपनीच्या निविदेत सहभागी होण्यापासून बंदी घातल्यामुळे आता अनिल अंबानी यांना धक्का बसला आहे. निविदेत सहभागी होण्यासाठी अनिल अंबानींच्या कंपनीतर्फे बोगस कागदपत्र सादर केली गेली, यासाठी त्यांच्या कंपन्यांवर ही कारवाई होत असल्याचे निवेदन सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिंट वृत संकेतस्थळाने यासंबंधी बातमी दिली आहे. या बातमीनुसार, महाराष्ट्र एनर्जी जेनरेशन लिमिटेड ज्याचे नाव आता रिलायन्स NU BESS लिमिटेड असे आहे. या कंपनीकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. विदेशी बँकाद्वारे अर्नेस्ट मनीसाठी जी बँक गँरंटी देण्यात आली होती, ती बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले की, निविदा भरणारी कंपनी मेसर्स रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असल्यामुळे त्यांनी मूळ कंपनीच्या ताकदीचा वापर करून आर्थिक पात्रता पूर्ण केल्या होत्या. जेव्हा या प्रकरणाची तपशीलवार तपासणी करण्यात आली तेव्हा आढळले की, रिलायन्स NU BESS ने घेतलेले सर्व निर्णय हे त्यांची पालक कंपनी रिलायन्स पॉवरच्या सल्ल्यानुसार घेतले होते.

हे वाचा >> डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होताच एलॉन मस्क मालामाल; एका दिवसांत केली २६ अब्ज डॉलर्सची कमाई

या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर कंपनीकडून उत्तर देण्यात आले आहे. ही अनावश्यक कारवाई असून आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. “या प्रकरणात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तिसऱ्या पक्षाविरोधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. आम्ही कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करू. तसेच कंपनीच्या ४० लाखांहून अधिक भागधारकांच्या हितासाठी आमच्यावरील अनावश्यक कारवाईला कायदेशीर आव्हान देऊ.

रिलायन्स पॉवर कंपनी नुकतीच कर्जमुक्त

अनिल अंबानींच्या रोजा पॉवर सप्लाय कंपनीने नुकतेच सिंगापूरच्या कंपनीचे ४८५ रुपयांचे कर्ज फेडले होते. यामुळे रोजा पॉवर सप्लाय ही कर्जमुक्त कंपनी बनली होती. सिंगापूरच्या कंपनीचे एकूण १३१८ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र रिलायन्स पॉवरवर आता निविदेत भाग घेण्यापासून रोखल्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil ambani suffers major setback his company banned for 3 years kvg