Iphone Price Due to Trump tariffs : जर तुम्ही आयफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्या खिशाला अतिरिक्त भर्दंड पडू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादल्याने आयफोनच्या किंमती वाढण्याच्या शक्यता आहेत. रॉयटरने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अमेरिकेने लादलेल्या व्यापार शुल्काचा अतिरिक्त खर्च ॲपलने ग्राहकांवर लादण्याचा निर्णय घेतला तर आयफोन ३० ते ४० टक्क्यांनी महाग होतील, असा दावा करण्यात येत आहे. अॅपलचे आयफोन प्रामुख्याने चीनमध्ये तयार केले जातात. चीनला व्यापार कराचा मोठा फटका बसला आहे. टॅरिफच्या परिणामामुळे अॅपल अडचणीत येऊ शकते. हे आयात शुल्क कंपनी स्वतः भरेल किंवा त्याचा भार ग्राहकांवर सोडला जाईल.
आयफोन १६ ची किंमत ४३ टक्क्यांनी वाढणार
सर्वाधिक चर्चेत असलेला आयफोन १६ मॉडेल ज्याची किंमत आता ६८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, यामध्ये ॲपलने किमतीत टॅरिफ खर्च जोडल्यास सुमारे या मोबाईलची किंमत ९७ हजारांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे या फोनच्या किंमतीत जवळपास ४३ टक्के वाढ होऊ शकते.
तर 16 Pro Max Iphone दोन लाखांवर जाईल
येत्या काळात आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईल लॉन्च होणार आहे. ६.९ इंच स्क्रीन आणि १ टेराबाइट स्टोरेज हे या फोनचं वैशिष्ट्य असणार आहे. पण अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे या फोनची किंमत जवळपास २ लाखांपर्यंत जाऊ शकते. हे आयात शुल्क लावून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील व्यावसायिकांना चीन व्यतिरिक्त इतर देशात उत्पादन आयात करण्याचा दबाव वाढवला आहे. अॅपलने यापूर्वी विशेष सवलती देऊन किमतीत वाढ टाळण्यात यश मिळवले असले तरी, यावेळी कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.
प्रमुख बाजारपेठांमध्ये आयफोनची विक्री आधीच मंदावत असताना वाढीव किमतींचा अतिरिक्त आर्थिक दबाव अॅपलसाठी परिस्थिती आणखी बिकट करू शकतो. अॅपलच्या आयफोन इंटेलिजेंसने प्रदान केलेले नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्ये काहींसाठी पुरेसे आकर्षक नसल्यामुळे ग्राहक नवीनतम मॉडेल्स खरेदी करण्यासाठी घाई करत नाहीत.
अॅपल ग्राहकांसाठी पुढे काय?
जर अॅपलने टॅरिफचा संपूर्ण भार ग्राहकांवर सोपवण्याचा निर्णय घेतला, तर आयफोनच्या विक्रीत मोठी घट होऊ शकते, कारण वाढलेल्या किमती ग्राहकांना सॅमसंगसारख्या इतर पर्यायांकडे वळण्यास भाग पाडू शकतात. सॅमसंगचे बहुतेक फोन बिगर-चीनी देशांमध्ये उत्पादित केले जात असल्याने कमी टॅरिफचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे.