जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या ॲप्पल आयएनसी कंपनीने भारतातही आयफोन मोबाइलचे उत्पादन सुरू केले आहे. यापुढे ॲप्पलची इतर उपकरणेही भारतात उत्पादित करण्याची योजना कंपनीने आखलेली आहे. भारतात आयफोन उत्पादित करण्याचे काम फॉक्सकॉन कंपनीकडून करण्यात येते. तमिळनाडूमध्ये फॉक्सकॉन कंपनीचा कारखाना आहे. या कारखान्यात विवाहित महिलांना नोकरी नाकारण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, मार्च २०२३ मध्ये पार्वती आणि जानकी नावाच्या दोन महिला फॉक्सकॉन कंपनीत काम मागण्यासाठी गेल्या होत्या. दोघींचे वय साधारण २० वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले गेले. कारखान्याच्या गेटवर सुरक्षा रक्षकाने त्यांना विवाहित आहात का? असा प्रश्न विचारला. जेव्हा दोघींनी विवाहित असल्याची माहिती दिली, तेव्हा त्यांना गेटवरूनच परत पाठविले गेले.
रॉयटर्सने पार्वतीशी याबाबत संवाद साधला आणि तिला खरे कारण विचारले. तेव्हा पार्वतीने सांगितले की, आम्ही बस स्टँडपासून कारखान्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली होती. कंपनीत विवाहित महिलांना रोजगार दिला जात नाही, अशी माहिती रिक्षावाल्यानेही आम्हाला दिली होती. पण आमही रिक्षावाल्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला रोजगार हवा होता म्हणून आम्ही कारखान्याच्या गेटवर पोहोचलो आणि चौकशी केली. तेव्हा मात्र आमचा भ्रमनिरास झाला.
कारखान्यात खरंच असा भेदभाव केला जातो का? याबाबत तपासणी करण्यासाठी रॉयटर्सने आणखी १७ कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख उघड न करण्याच्या अटीवर कारखान्यात विवाहित महिलांना रोजगार दिला जात नाही, यावर शिक्कामोर्तब केले. याबाबत फॉक्सकॉनचे माजी एचआर अधिकारी एस. पॉल यांच्याशी रॉयटर्सने संपर्क साधला. यावेळी त्यांनीही कंपनीचे हे धोरण असल्याचा दुजोरा दिला. विवाहित महिलांवर अविवाहित महिलांपेक्षा कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे आम्ही अविवाहित महिलांना रोजगारासाठी प्राधान्य देतो, असे कारण त्यांनी सांगितले.
एस. पॉल म्हणाले की, आम्हाला हे धोरण तोंडी सांगितले गेले होते. भरती करणाऱ्या एजन्सींना आम्ही हेच तोंडी सांगितले. ज्यामुळे मुलाखतीदरम्यान विवाहित असलेल्या महिलांना नोकरीपासून अलिप्त ठेवण्यात येते. एस. पॉल यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये फॉक्सकॉनच्या नोकरीचा राजीनामा देऊन एका कन्सलटन्सी फर्ममध्ये काम सुरू केले. लग्नानंतर भारतीय महिलांना अनेक कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर सांस्कृतिक आणि सामाजिक दबाव असतो. लग्नानंतर गर्भधारणा आणि मुलांमुळे त्यांना वारंवार सुट्ट्यांवर जावे लागते, अशा काही कारणांमुळे विवाहित महिलांना नोकरी नाकारली जाते.
मात्र फॉक्सकॉनचे हे कायमचे धोरण नाही, अशीही माहिती समोर आली आहे. जेव्हा उत्पादन वाढलेले असते तेव्हा मनुष्यबळाची कमतरता भासू लागते. अशावेळी या नियमात शिथिलता आणली जाते, अशी माहिती फॉक्सकॉनच्या इतर माजी अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अनेकवेळा नोकरभरती राबविणाऱ्या एजन्सी विवाहित महिलांना त्यांची ओळख लपविण्याचा सल्ला देतात. जेणेकरून त्यांना कंपनीला मनुष्यबळ पुरविता येईल.