आशीष पाटील
म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२२ अखेर दरमहा १३,६०० कोटी रुपयांच्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीसह, देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण गंगाजळी ४० लाख कोटी रुपयांवर गेली आहे. केवळ गंगाजळीतच वाढ नव्हे तर म्युच्युअल फंड उद्योगात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत असल्याचे हे द्योतक निश्चितच आहे.
उद्योगाच्या गंगाजळीत एकट्या महाराष्ट्राचा ४२ टक्के वाटा आहे. पण जर आपण मुंबई, पुणे आणि नागपूर यांचे योगदान बाजूला काढले तर राज्याच्या इतर भागांचे म्युच्युअल फंडात फारसे योगदान नाही. किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग हळूहळू वाढत आहे आणि महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या मानसिकतेतदेखील बदल होताना दिसत आहे. लोक हळूहळू सोने, स्थावर मालमत्ता आणि बँक एफडी यांसारख्या पारंपरिक गुंतवणुकांना पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांना एक उमदे गुंतवणूक साधन म्हणून ओळखू लागले आहेत.
‘ॲम्फी’द्वारे उपलब्ध आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड उद्योगात एकूण १,४५० योजना सध्या सुरू असून, त्या ४८ उप-वर्गांसह पाच प्रमुख वर्गात विभागलेल्या आहेत. यापैकी नेमक्या कोणत्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करावी याबद्दल विशेषकरून नवीन गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. त्यांचा एकंदर सहभाग वाढत असताना त्यांची ही संभ्रमावस्था दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामध्ये शाश्वत स्वरूपात गुंतवणूक करण्यास मदत करण्यासाठी, गुंतवणुकीसाठी योग्य मानसिकता किंवा दृष्टिकोन तयार करणे आवश्यक आहे. हे घडून येण्यासाठी, जोखमीचे एकूणच आकलन ही अत्यंत महत्त्वाची व प्राधान्यक्रमाची गोष्ट बनते.
शुद्धपणे शब्दकोषातील अर्थाप्रमाणे जोखीम म्हणजे काहीतरी धोकादायक किंवा अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. जोखीम या शब्दाला अशा तऱ्हेने नकारात्मक अर्थ जोडलेला आहे, परंतु वित्तविश्वामध्ये, जोखीम म्हणजे आपल्या जवळच्या विशिष्ट ऐवजावरील वेगवेगळ्या परिणामांची सांख्यिकीय संभाव्यता असा अर्थ अभिप्रेत आहे.
हे वेगवेगळे परिणाम चांगले किंवा वाईट यापैकी काहीही असू शकतात. उदाहरणार्थ, जर आपण निफ्टी ५० निर्देशांकामध्ये एका वर्षासाठी गुंतवणूक केली आहे, तर ऐतिहासिकदृष्ट्या कामगिरीचा आढावा घेतल्यास आपल्याला उणे ५६ टक्के ते कमाल १०८ टक्के या दरम्यान परतावा मिळू शकतो. म्हणजेच, वेगवेगळ्या शक्यता संभवतात, तरी याला आम्ही म्हणतो की, धोका (जोखीम) जास्त आहे. परंतु जर आम्ही निश्चित परतावा असलेल्या बँक एफडीमध्ये गुंतवणूक केली तर वर्षाच्या शेवटी ठरलेला परतावा निश्चितच मिळेल. या प्रकरणी दुसरी कोणतीही शक्यता नाही. म्हणूनच, म्हटले जाते की बँक एफडीमध्ये गुंतवणुकीत खूप कमी किंवा कोणताही धोका नाही.
‘जोखमी’चा शब्दकोषातील अर्थ काहीतरी धोकादायक किंवा अप्रिय होऊ शकते, असा आहे, जो वित्तविश्वाला अभिप्रेत जोखमीच्या अर्थाशी फारकत घेणारा आहे. कारण शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. समजा जर आपण १४ टक्के परतावा या गुंतवणुकीतून तयार केला, तर अंतर्निहित जोखीम असली तरीही तो चांगला परिणाम आहे असे आपण म्हणू शकतो. नवीन गुंतवणूकदार म्हणून आपल्याला ही जोखीम समजून घेणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी या जोखमीच्या पैलूचे कुशलतेने व्यवस्थापन करणे हे म्युच्युअल फंड व्यवस्थापकांचे काम आहे, जे अर्थातच या कामात तज्ज्ञ मानले जातात.
जोखीम कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे. आता ते कसे कार्य करते ते समजून घेऊ. जसजसा गुंतवणुकीचा कालावधी वाढत जातो, तसतसा किमान परतावाही वाढत जातो आणि नकारात्मक परताव्याची शक्यता कमी होते, हे या कोष्टकावरून ठळकपणे दिसून येते. गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांपेक्षा जास्त असल्यास, निफ्टी ५० टीआयआरमध्ये नकारात्मक परताव्याची शक्यता नगण्य बनते.
जोखीम कमी करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंडांमध्ये गुंतवणूक करणे होय. डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड हे रोखे (डेट) आणि समभाग (इक्विटी) अशी संमिश्र गुंतवणूक करतात. गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देताना जोखीम कमी करणे हा बहुतेक निधी व्यवस्थापकांचा उद्देश असतो. त्यामुळे ते कोणत्याही वेळी योग्य समभागांत गुंतवणूक करण्यासाठी मूलभूत निकषांचा वापर करतात.
डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड केवळ पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या आणि नवखे गुंतवणूकदार जसे की शालेय शिक्षक, संगीतकार, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती वगैरे (मर्यादित ज्ञान/समजामुळे) जोखीम टाळू पाहणाऱ्यांसाठी योग्य मानले जातातच, पण जोखीम घेत असलेल्या सराईत गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठीदेखील ते योग्य आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंडातील गुंतवणुकीने ग्राहकांना गुंतवणुकीचा खूप चांगला अनुभव दिला आहे.
जोखीम कमी करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे एसआयपी / एसटीपी याद्वारे वेळोवेळी गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणे होय. नियतकालिक आणि नियमित गुंतवणुकीतून किमतीच्या सरासरीचा (कॉस्ट ॲव्हरेजिंग) फायदा मिळत असतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी जोखीम आपोआप कमी होते. इतर निकष जो गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तो म्हणजे, स्वतःची जोखीम सोसण्याची क्षमता जाणून घेणे. अर्थात परताव्याची अपेक्षा किती आणि गुंतवणुकीचा कालावधी काय हे निश्चित केले गेले पाहिजे. एकदा ते नक्की झाल्यावर, जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही ज्या फंड घराण्यावर विश्वास ठेवू शकता तो ओळखा.
गुंतवणुकीला सुरुवात करताना, त्या समयी सर्वाधिक परतावा देणारी योजना निवडण्याची चूक बहुतेक गुंतवणूकदार करतात. परतावा हा अस्थिर असतो आणि भविष्यात बदलू शकतो ही बाब यातून दुर्लक्षिली जाते. भूतकाळातील चांगली कामगिरी ही भविष्यातील कामगिरीची हमी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. गुंतवणुकीचा योग्य दृष्टिकोन वापरणारे आणि उद्योगात चांगली विश्वासार्हता असलेले फंड घराणे ओळखणे म्हणूनच महत्त्वाचे.
सारांशात, अस्थिरता हा बाजाराचा अपरिहार्य गुण आहे. घाबरून जाण्याऐवजी, तिला स्वीकारणे आवश्यक आहे. गुंतवणूकदाराने दीर्घकालीन गुंतवणूक करून किंवा डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंडांमध्ये गुंतवणूक करून किंवा वेळोवेळी एसआयपी / एसटीपी याद्वारे जोखमीशी मैत्री करावी. भीतीला तुमच्या विवेकबुद्धी व निर्णयक्षमतेवर ताबा मिळवू न देण्यातूनच गुंतवणुकीची योग्य मानसिकता निर्माण होऊ शकेल.
(लेखक, एलआयसी म्युच्युअल फंड ॲसेट मॅनेजमेंट लि.चे उत्पादन आणि धोरण प्रमुख)
अस्वीकृती: लेखात व्यक्त केलेले विचार, दृष्टिकोन आणि मते पूर्णपणे लेखकाची आहेत आणि ती लेखक कार्यरत असलेल्या संस्था, समिती किंवा इतर गट किंवा व्यक्तीशी निगडित असणे आवश्यक नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावीत.
निफ्टी ५० परतावा / गुंतवणूक कालावधी एक वर्ष* पाच वर्षे* १० वर्षे*
जास्तीत जास्त परतावा १०८.०३% ४६.५८% २२.५५%
सरासरी परतावा १६.९२% १५.७६% १४.३०%
किमान परतावा -५६.३७% -१.९१% ५.९३%
सकारात्मक परताव्याची शक्यता ७५.५७% ९९.८७% १००.००%
(*‘निफ्टी ५० टीआरआय’चा जानेवारी २००० ते डिसेंबर २०२२ कालावधीतील चलत परतावा. माहिती स्रोत: एनएसई.)