Tata Group To Make Apple iPhones in India Marathi News : आयफोन प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतात आता आयफोनची निर्मिती टाटा समूह करणार आहे. विस्ट्रॉन या कंपनीकडून ही निर्मिती केली जात होती. या कंपनीकडूनच अॅपलला भारतातून जागतिक व्यापारपेठ मिळाला होता. परंतु, आता टाटाने विस्ट्रॉन कंपनी विकत घेतली आहे. इलक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅपल कंपनीच्या नियमांमुळे विस्ट्रॉन कंपनी तोट्यात होती. त्यामुळे ही कंपनी टाटा विकत घेणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. विस्ट्रॉन कॉर्पच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत इतर सहयोगी कंपन्यांनी कराराला मान्यता दिली आहे. टाटांना विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंगमधील दोन्ही कंपन्यांचे १०० टक्के शेअर्स मिळणार आहेत.

भारतीय कंपनी करणार आयफोनची निर्मिती

विस्ट्रॉनचा कर्नाटकमध्ये आयफोन निर्मितीचा प्लांट आहे. इथं आयफोन १२ आणि आयफोन १४ ची निर्मिती झाली. हाच प्लांट आता टाटा समूह विकत घेणार आहे. विस्ट्रॉनच्या निमित्ताने आयफोन भारतात तयार होत होते. परंतु, विस्ट्रॉन ही तैवानची कंपनी आहे. याचाच अर्थ भारतात आयफोनची निर्मिती होत असली तरीही स्थानिक कंपनीकडे हा व्यवहार नव्हता. मात्र, आता टाटाच्या निमित्ताने आयफोनची निर्मिती भारतीय कंपनी करणार आहे.

चीनला मिळणार का टक्कर?

आयफोन १५ ची निर्मिती भारतात केली गेली. परंतु, आयफोन १५ प्रो चीनमध्ये तयार केला जातो. अॅपलच्या एकूण उत्पादनांपैकी ७ टक्के उत्पादने भारतात तयार होतात. तर, चीन अजूनही अॅपलचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे आता चीनला भारत टक्कर देणार का हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, या कराराविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी PLI योजनेने भारताला स्मार्टफोन उत्पादन आणि निर्यातीसाठी एक विश्वासार्ह आणि प्रमुख केंद्र बनण्यास प्रवृत्त केले आहे. आता अवघ्या अडीच वर्षांत टाटा कंपनी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतातून आयफोन बनवण्यास सुरुवात करेल. विस्ट्रॉन ऑपरेशन्सचा ताबा घेतल्याबद्दल टाटा टीमचे अभिनंदन.”

तसंच, चंद्रशेखर यांनी विस्ट्रॉन कंपनीचेही आभार मानले. “विस्ट्रॉनचे भारतात योगदान आहे. भारतीय उत्पादन जागतिक पातळीवर पाठवण्याकरता भारताला विस्ट्रॉनने इतर भारतीय कंपन्यांचे नेतृत्त्व केले”, असंही चंद्रशेखर म्हणाले. “इलेक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्रालय जागतिक भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या वाढीला पूर्ण पाठिंबा देणार आहे. भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक् शक्ती बनवण्याचे पंतप्रधानांचे उद्दीष्ट्य साध्य करणाऱ्या कंपन्यांना सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले.

गेल्या १५० वर्षांपासून टाटा समूह भारतात कार्यरत आहे. टाटा समूहाकडून मीठापासून उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानापर्यंत निर्मिती केली जाते. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातही टाटा समूहाने उडी घेतली. तसंच, ई-कॉमर्समध्येही टाटा समूहाचा प्रयत्न सुरू आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ata group will start making apple iphones in india sgk