ATM Withdrawal Fee Hike: देशात कुठेही गेलो तरी रोख रक्कम मिळविण्याचा हमखास मार्ग म्हणजे एटीएम. बाहेर असल्यावर तात्काळ पैशांची गरज भागविण्यासाठी एटीएमचा वापर होत असतो. मात्र आता हा वापर खर्चिक होणार आहे. कारण एटीएममधून पैसे काढताना काही शुल्क भरावे लागणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात एंटरचेंज शुल्क १७ रुपयांहून १९ रुपये करण्यास मंजूरी दिली आहे. हा बदल १ मे २०२५ पासून लागू होईल.
एटीएम कार्ड देणाऱ्या कंपन्या आणि एटीएम चालविणाऱ्या बँकासाठी आकारण्यात येणारे हे शुल्क शेवटी ग्राहकांच्या बँकिंग व्यवहारावर परिणाम करणारे आहे. सध्या बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्लीमधील खातेधारक त्यांच्या बँक खात्याच्या एटीममधून महिन्याला पाचवेळा मोफत पैसे काढू शकतात. तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढू शकतात. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, आतापर्यंत मोफत सेवा असणारी ही सुविधा इंटरचार्ज शुल्क वाढविल्यामुळे खर्चिक होणार असून त्याचा परिणाम खातेधारकांवर होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत भारतात २,१६,७०६ एटीएम सक्रिय होते.
नॅशनल फायनान्स स्विच स्टिरिंग कमिटीने ६ मार्च २०२४ रोजी एटीएम इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे देशाअंतर्गत आर्थिक व्यवहारांसाठी आता १७ रुपयांऐवजी १९ रुपये आणि गैर-वित्तीय व्यवहारांसाठी ६ रुपयांऐवजी ७ रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.
ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाचे
एटीएम कार्डधारकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येक महिन्यासाठी मोफत असलेल्या मर्यादेनंतर अधिक वेळा पैसे काढल्यानंतरच त्यांना हे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर छोट्या बँकांवर दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्या बँकेचे एटीएम मर्यादित संख्येत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर अवलंबून राहावे लागते. अशावेळी जर इतर एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्का आकारले गेल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांवरच होणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd