Tata Motors stock price: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या विदेशी वाहन आणि वाहनाच्या सुट्या भागावर २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारतातील ऑटो क्षेत्रातील कंपन्यांना मोठा झटका बसला असून ऑटोच्या शेअर्सची धडाधड विक्री सुरू झाली. ऑटो पार्ट्स विदेशात आयात करणाऱ्या कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसला. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स जवळपास सहा टक्क्यांनी कोसळले.
टाटा मोटर्सचे शेअर का कोसळले?
टाटा मोटर्स ही जॅग्वार लँड रोव्हर कंपनीची पालक कंपनी आहे. अमेरिकेतील ऑटो क्षेत्रात या कंपनीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. जॅग्वार लँड रोव्हरने २०२४ आर्थिक वर्षात प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, त्यांच्या एकूण विक्रीत अमेरिकेचा वाटा २२ टक्के इतका होता. त्यामुळेच ट्रम्प यांच्या निर्णयाचा थेट फटका टाटा मोटर्स कंपनीला बसला आहे.
गुरूवारी बाजार उघडताच टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. ज्यामुळे शेअर ६६१.३५ पर्यंत घसरला. बुधवारी बाजार बंद होताना शेअर्सची किंमत ७०७.९५ रुपये इतकी होती. मागच्या पाच महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअरची जोरदार विक्री झाली आहे. मागच्या वर्षी शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर शेअरमध्ये ४८ टक्क्यांची तूट पाहायला मिळाली. १,१७९ रुपये या उच्चांकावरून काही महिन्यांपूर्वी हा शेअर ६०६.३० रुपयांवर आला होता.
इतर शेअर्सवरही परिणाम
टाटा मोटर्स व्यतिरिक्त महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलँड, आइशर मोटर्स, बॉस या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. याशिवाय ऑटो पार्टस बनविणाऱ्या कंपन्या जसे की, एमआरएफ, अपोलो टायर्स, भारत फोर्ज, उनो मिंडा, बॉश लिमिटेड, बाळकृष्ण इंडस्ट्रीज यांचेही शेअर काही प्रमाणात खाली आले. दरम्यान मारुतीच्या शेअरवर मात्र काही परिणाम झालेला नाही. त्यांची वाहने अमेरिकेत निर्यात केली जात नाहीत.
निफ्टीचा ऑटो निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला
ऑटो शेअर्समध्ये घसरण आल्यामुळे निफ्टीचा ऑटो निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला. बाजार उघडताच टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. यामुळे टाटा मोटर्सच्या भांडवलातून १० कोटी रुपये कमी झाले. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये ७.६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या शेअरने इंट्राडेचा १२४.७३ रुपयांचा तळ गाठला. अशोक लेलँडचा शेअरमध्ये ४.५ टक्क्यांची घसरण होऊन तो २०५.१७ रूपयांवर आला.