Banks hike FD rates: वाढत्या पत मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांच्याकडील निधी वाढविण्यासाठी सध्या सर्व बॅंका प्रयत्नशील आहेत. यासाठी बँकांनी विविध गोष्टींचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ठेवींच्या दरांमध्ये वाढ करणे हा त्यातीलच एक पर्याय. अनेक बॅंकांनी त्यांच्या ठेवींच्या दरांमध्ये नुकतीच वाढ केली आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी हा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी हा व्याजदर ५ ते ५.५ टक्के इतका होता. आता त्यामध्ये बदल करुन तो ७-९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. शेअर बाजार केव्हा कोसळेल याचा नेम नसतो, त्यामुळे आजही शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा बॅंकांमधील ठेवी अधिक सुरक्षित मानल्या जातात.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकांपैकी एक आहे. स्टेट बॅंकेने १५ फेब्रुवारीपासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये २५ बेस पॉईंट्स वाढ केली आहे. तसेच एसबीआय बॅंक ४०० दिवसांसाठीच्या ठेव योजनेवर ७.१० टक्के व्याजगर देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा होणार आहे. त्यांना ठेवींवर अतिरिक्त व्याज मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बॅंक
१९ डिसेंबर २०२२ पासून ठराविक कालावधीसाठी ठेवींचा व्याजदर बँकेने ५० बेस पॉईंट्सने वाढवला आहे. बॅंकेतर्फे २ कोटी रुपयांच्या ठेवींवरील व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. तसेच बँकेने बचत ठेवींवर ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. एका वर्षापासून ते ६६५ दिवसांच्या ठेवींसाठी ७.५५ व्याजदर असलेली ऑफर पंजाब नॅशनल बॅंकेद्वारे देण्यात आली आहे. तसेच दोन – तीन वर्षांसाठी बॅंकेमध्ये गुंतवणूक केल्यास ७.५५ टक्के व्याजदर मिळणार आहे.
बाजारातली माणसं: लढवय्या माणूस
कोटक महिंद्रा बॅंक
कोटक महिंद्रा बॅंकमध्ये १० फेब्रुवारीपासून पुढे १५ महिने ते दोन वर्षांच्या कालावधीच्या बचत ठेवींवरील व्याजदराममध्ये २५ बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी २ कोटी रुपयांपर्यंतची ठेव केल्यास त्यांना वार्षिक ७.६० टक्के व्याज मिळणार आहे. दोन वर्षांसाठी २ ते ७ कोटी रुपयांच्या ठेवींची गुंतवणूक केल्यास त्यावर ७.२५ टक्के व्याजदर मिळणार आहे. तर २ कोटी रुपयांपर्यंतची ठेव ठेवल्यास त्यावर ७.१० टक्के व्याजदर मिळेल.
बंधन बॅंक
कोलकाता स्थित बंधन बॅंकेमधील ठेवींच्या व्याजदरामध्ये ६ फेब्रुवारीपासून बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत मुदत ठेवींचा व्याजदर ५० बेस पॉइंटसने वाढवण्यात आला आहे. बंधन बॅंकेतर्फ जेष्ठ नागरिकांना त्यांनी ठेवलेल्या ठेवींवर ८.५ टक्के व्याज मिळणार आहे. एका वर्षासाठीच्या ठेवींवर ७ टक्के व्याजदर मिळणार आहे.
अॅक्सिस बॅंक
अॅक्सिस बॅंकेद्वारे त्यांच्या बचत ठेवींच्या व्याजदरांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ११ फेब्रुवारी पासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदर वाढण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. ७ ते ४५ दिवसांसाठी ठेवलेल्या ठेवींवर ३.५० टक्के व्याज मिळणार असून ४६ ते ६० दिवसांसाठी ४ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे.
मार्ग सुबत्तेचा:‘पोर्टफोलिओ’ बांधणे म्हणजे नक्की काय असते?
आयसीआयसीआय बॅंक
आयसीआयसीआय बॅंकेने ७ फेब्रुवारीपासून २ ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर वाढवल्याची घोषणा केली. २७१ दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ठेवलेल्या ठेवींवर ६.६५ टक्के, तर १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीमधील ठेवींवर ७.१० टक्के व्याजदराची ऑफर आयसीआयसीआय बॅंकने दिली आहे.