गौतम अदाणी आणि त्यांच्या समूहासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील ७० वीज कंपन्यांना मागे टाकत अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (Adani Electricity) वीज वितरणात नंबर वन कंपनी बनली आहे. कंपनीचा उत्तम कारभार, आर्थिक स्थिरता, बाहेरील वातावरण यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीला हा सन्मान मिळाला आहे.
सर्व निकषांमध्ये कंपनी पुढे
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वीज वितरण युटिलिटीच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ‘वार्षिक एकात्मिक मानांकन आणि क्रमवारी’ (Annual Integrated Rating and Ranking) च्या ११ व्या आवृत्तीमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटीने A+ ग्रेडसह प्रथम क्रमांक मिळवला आणि १०० पैकी ९९.६ हे सर्वोच्च एकात्मिक गुण मिळवले. अदाणी इलेक्ट्रिसिटीने कामगिरी उत्कृष्टतेसाठी १३ पैकी १२.८ गुण मिळवले, ज्यामध्ये बिलिंग कार्यक्षमता, कमी वितरण हानी, संकलन कार्यक्षमता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांचा समावेश आहे. इतर सर्व पॅरामीटर्समध्ये कंपनीने १२ पैकी ११.९ गुण मिळवले आहेत. तसेच कंपनीला आर्थिक स्थिरतेचे ७५ गुण मिळाले आहेत.
‘या’ कारणांसाठी उत्तम गुण
डिजिटाइज्ड बिल जनरेशन आणि पेमेंट – ग्राहकांसाठी पेमेंट सुलभ करण्यासाठी UPI आणि पेमेंट गेटवेसह भागीदारी केली आहे. प्रगत मीटर रीडिंग तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे बिलिंग त्रुटी कमी झाल्या आहेत. विश्लेषण आणि व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या वापरामुळे वीजचोरी रोखण्यात मदत झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत वितरण तोटा ९.१ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर आला आहे.
सर्वात कमी दर जाहीर केला
मॅकिन्से अँड कंपनीने अलीकडेच प्रकाशित केलेल्या रेटिंग अहवालात २०१९-२०२० ते २०२२-२०२३ या तीन आर्थिक वर्षांतील वीज वितरण युटिलिटीचे मूल्यांकन केले आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (Adani Electricity) ने अलीकडेच बहु-वर्षीय शुल्क यंत्रणेच्या अंतर्गत पुनरावलोकन केलेल्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व डिस्कॉम्समध्ये सर्वात कमी दरवाढीची घोषणा केली.
हेही वाचाः कर भरण्यात देशातील ज्येष्ठ नागरिक आघाडीवर; २०२२-२३ मध्ये एक लाख कोटींहून अधिक प्राप्तिकर जमा
…म्हणून अनेक कंपन्यांचे मूल्यांकन केले जाते
वार्षिक एकात्मिक मानांकन आणि क्रमवारी हे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे आयोजित केले जाते, जे २०१२ मध्ये ऊर्जा मंत्रालयाने मंजूर केलेल्या फ्रेमवर्कचे पालन करून नोडल एजन्सी म्हणून काम करते. या मूल्यमापनात एकूण ७१ वीज वितरण युटिलिटिज, ४५ राज्य वितरण कंपन्या, १४ खासगी डिस्कॉम आणि १२ वीज विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचाः पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मुलांचा विमा काढणे फायदेशीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ