Harsh Goenka Advise to Investors: आरपीजी एंटरप्राईजेसचे अध्यक्ष अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर मार्केट सध्या अस्थिर झाल्याबाबत भाष्य केले आहे. एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून ते अनेकदा उपहासात्मक विधान करत असतात. तसेच भारतीय उद्योगावर त्यांचे गमतीशीर भाष्यही अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. याबाबत एक पोस्ट हर्ष गोयंका यांनी केली आहे. बॉलिवूड स्टाईलप्रमाणे मार्केटवर भाष्य करताना गुंतवणूकदारांना महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
हर्ष गोयंका म्हणाले, “आजकाल मार्केटमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. मार्केट कधी सलमान खान, तर कधी उदय चोप्राप्रमाणे भासत आहे.” मार्केटमध्ये जेव्हा मंदी सुरू असते तेव्हा धोरणात्मक गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते, हे या पोस्टमधून गोयंका यांनी अधोरेखित केले आहे. चांगल्या दर्जाचे शेअर क्लिअरन्स सेलमध्ये विकत घेता येतात, असेही ते म्हणाले.
गुंतवणुकदारांना योग्य गुंतवणुकीचे महत्त्व समजावे, यासाठी गोयंका यांनी मिश्किल शैलीत टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “जेव्हा शेअरच्या किमती खाली येतात, तेव्हा चांगल्या दर्जाचे शेअर विकत घेऊ शकता. पण लोकांची धांदल उडते आणि त्यात ते अंतर्वस्त्रही विकून टाकतात. मार्केट जेव्हा रॅली करायला लागतो, तेव्हा पोर्टफोलियोही डिस्को करत असतो.”
गुंतवणुकदारांना मोलाचा सल्ला देताना हर्ष गोयंका म्हणाले, “एक गोष्ट ध्यानात ठेवा. गुंतवणुकीचा खरा हिरो तोच आहे, जो अचानक आलेल्या संकटातही पॉपकॉर्न नाही तर पोर्टफोलियो विकत घेतो. दूरदृष्टी ठेवून विचार करा. म्हणजे रडण्याची वेळ येणार नाही.”
लाँग टर्म गुंतवणुकीचा सल्ला
अब्जाधीश असलेल्या हर्ष गोयंका यांनी गुंतवणुकदारांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले आहे. छोट्या मुदतीसाठी गुंतवणूक केली तर नफा कमी पण नुकसान अधिक होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते.
बायको माझ्यापेक्षा हुशार
हर्ष गोयंका यांनी गुंतवणुकीचे महत्त्व सांगणारी आणखी एक पोस्ट दोन दिवसांपूर्वी (२३ एप्रिल) केली होती. ‘बायको माझ्यापेक्षा हुशार’, अशा आशयाची ही पोस्ट होती. यात ते म्हणाले, “१० वर्षांपूर्वी मी ८ लाखांत गाडी विकत घेतली, बायकोने तेवढ्याच किमतीचे सोने घेतले. आज माझ्या त्या गाडीची किंमत दीड लाख आहे. तर बायकोने घेतलेल्या सोन्याची किंमत आता ३२ लाख झाली आहे. बायको माझ्यापेक्षा हुशार निघाली.”
हर्ष गोयंका पुढे म्हणाले की, मी बायकोला म्हणालो, चल पर्यटनाला जाऊ. ती म्हणाली, पर्यटन पाच दिवसांचे असेल. पण सोने घेतले तर ते पाच पिढ्यांना पुरेल. मी एक लाखांचा फोन घेतला. तिने तेवढ्याच किमतीचे सोने घेतले. आज माझा तो फोन आठ हजारांचा आहे आणि तिच्या सोन्याची किंमत दोन लाख झाली आहे.