Delhi Warehouses Raids: ऑनलाइन शॉपिंग करण्याचा ट्रेंड आता अनेकांच्या अंगवळणी पडला आहे. छोट्यातली छोटी वस्तूही आता ऑनलाइन ई-कॉमर्स संकेतस्थळावरून मागवली जाते. अगदी ग्रामीण भागातही आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या संकेतस्थळावरून वस्तू मागवल्या जात आहेत. या क्षेत्रातला नफा वाढत असल्याचे पाहून अनेक फसवणुकीची प्रकरणेही आता समोर येऊ लागली आहेत. भारतीय मानक संस्था अर्थात ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ने दिल्लीतील ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या काही गोदामांवर धाड टाकली. यावेळी ७० लाखांहून अधिक किमतीच्या बोगस वस्तू जप्त करण्यात आल्या.
दिल्लीच्या मोहन को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल परिसरातील ॲमेझॉन सेलर्स प्रा. लि. या गोदामावर १९ मार्च रोजी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (बीआयएस) धाड टाकली. १५ तासांची झडती घेतल्यानंतर आयएसआय (भारतीय मानक संस्था) शिक्का नसलेल्या आणि आयएसआयचा खोटा शिक्का लावलेल्या ३,५०० हून अधिक वस्तू जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेल्या वस्तूंमध्ये गिझर, फूड मिक्सर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. या वस्तूंची एकूण किंमत ७० लाखांच्या आसपास असल्याची माहिती पीआयबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे.
फ्लिपकार्टच्या गोदामावरही धाड
दुसरीकडे दिल्लीच्या त्रिनगर परिसरात असलेल्या इन्स्टाकार्ट सर्विसेस प्रा. लि. या फ्लिपकार्टशी संबंधित गोदामावरदेखील धाड टाकण्यात आली. या गोदामातून आयएसआय मार्क नसलेली स्पोर्ट्स फूटवेअर जप्त करण्यात आले. ५९० हून अधिक बुटांचे जोड ताब्यात घेतले असून त्याची किंमत ६ लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे.
ॲमेझॉन इंडियाने सदर प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “आमच्या प्लॅटफॉर्मवर नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर आम्ही योग्य ती कारवाई करत असतो. ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी आम्ही यंत्रणांना सहकार्य करून काम करू.” मात्र ऑनलाइन बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंची जबाबदारी नेमकी कुणाची? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील विक्रेत्यांच्या माथी सर्व आरोप ढकलून नामानिराळे राहू शकतात का? त्यांची काहीच जबाबदारी नाही का? असे काही प्रश्न निर्माण होत आहेत.
भारतीय मानस संस्थेच्या वतीने ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा दर्जा योग्य आणि नियमानुसार आहे का? याची तपासणी केली जात आहे. मागच्या काही महिन्यात बीआयएसने दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद, लखनऊ अशा काही शहरांतील गोदामावर धाडी टाकल्या आहेत.
ग्राहकांनी आणखी सावध राहण्याची गरज
दरम्यान ग्राहकांनी आता ऑनलाइन शॉपिंग करत असताना अधिक सजग होण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. तुम्ही काय ऑर्डर करत आहात तसेच वस्तू आल्यानंतर ती योग्य दर्जाची आहे का? याची तपासणी करून घ्या. नाहीतर ज्या वस्तूसाठी तुम्ही पैसे खर्च केले आहेत, त्याऐवजी तुम्हाला भलतीच वस्तू मिळायची.