Ambulance Service at Blinkit : किराणा माल ते जेवणापर्यंत सर्व गोष्टी एका क्लिकवर आपल्या दारात हजर करणाऱ्या झोमॅटो आणि ब्लिंकिटने आता एका क्लिकवर रुग्णवाहिकाही सुरू केली आहे. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी ही माहिती दिली. “जलदपणा फक्त किराणामालासाठी नाही. सामाजिक प्रभावाचा विचार करून विक्रमी गतीने गोष्टी प्रत्यक्षात आणल्याबद्दल अलबिंदर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. हे जगात पहिल्यांदाच घडतंय”, दीपंदर गोयल सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले.
झोमॅटोची उपकंपनी असलेली ब्लिंकिट ही ई-कॉमर्स कंपनी आहे. या अॅपद्वारे घरातील सर्व किराणामालाच्या वस्तू एका क्लिकवर अगदी दहा ते वीस मिनिटांत तुमच्या दारापर्यंत पोहोचवल्या जातात. याच कंपनीने आता १० मिनिटांत रुग्णवाहिका सेवा पुरावण्याचं काम हाती घेतलं आहे. नागरिकांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून ब्लिंकिटने ही सेवा सुरू केली असून सध्याच्या घडीला फक्त गुरुग्राममध्येच ही सेवा कार्यरत आहे. येत्या दिवसांत अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हणणं आहे.
ब्लिंकिटची १० मिनिटांत रुग्णवाहिका सेवा जलद वैद्यकीय मदत देण्याकरता कंपनीच्या विद्यमान हायपरलोकल वितरण पायाभूत सुविधांचा लाभ घेते. ही सेवा २४*७ उपलब्ध असेल. प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक आणि सुसज्ज रुग्णवाहिका १० मिनिटांच्या विंडोमध्ये आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असतील.
“Quick” is not just about commerce. It’s about saving lives as well.
— Deepinder Goyal (@deepigoyal) January 2, 2025
This is a first in the world. Congratulations @albinder and team for thinking of societal impact, and making things come true with record speed. So much more can happen in “quick” and I truly believe that this… https://t.co/aJbrwSzRtL
ब्लिंकटचे सीईओ अलबिंदर धिंडसा एक्सवर म्हणाले, आम्ही आमच्या शहरांमध्ये जलद आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा पुरवण्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने आमचे पहिले पाऊल टाकत आहोत. गुरुग्राममध्ये आजपासून पहिल्या पाच रुग्णवाहिका रस्त्यावर येणार आहेत. आम्ही अधिक क्षेत्रांमध्ये सेवा विस्तारित केल्यामुळे तुम्हाला ब्लिंकिट अॅपद्वारे बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय दिसू शकेल.
रुग्णावाहिकेची वैशिष्ट्य काय?
- या रुग्णवाहिकेत प्राणवायु सिलिंडर, ऑटोमेडेट एक्टर्नल डिफिब्रिलेटर, स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि आवश्यक आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शनसह जीवनरक्षक उपकरणे असणार आहेत.
- प्रत्येक रुग्णवाहिकेत एक पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि एक प्रशिक्षित ड्रायव्हर असणार आहे.
- या रुग्णावाहिकेच्या सेवेतून कंपनीने नफाचे उद्दिष्ट ठेवलेले नाही. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे, असंही कंपनीने स्पष्ट केलं.
- ही सेवा काळजीपूर्वक वाढवली जाईल. कारण ही सेवा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढील दोन वर्षांत सर्व प्रमुख शहरांमध्ये या सेवेचा विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट्य आहे, असं ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा म्हणाले.